Amruta Fadnavis Resign from Axis Bank : अमृता फडणवीस यांची ओळख केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अशी नसून त्या सध्या गायिका म्हणून लोकांना परिचित आहेत. पण तत्पूर्वी त्या एक बँकर म्हणून कार्यरत होत्या. तब्बल २३ वर्षे त्यांनी एका खासगी बँकेत ट्रेनी ते सिनिअर व्हाईस प्रेसिडंड म्हणून काम केलं. या बँकेच्या कामाचा आता त्यांनी राजीनामा दिला आहे. नुकतेच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी याची माहिती दिली.
अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं, "२३ वर्षांपूर्वी, मी अॅक्सिस बँकेत एक तरुण मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून प्रवेश केला. आज, मी कृतज्ञतापूर्ण अंतःकरणानं सिनिअर व्हाइस प्रेसिडेंड म्हणून माझं काम थांबवत आहे. शाखा कामकाजापासून कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत, ट्रेझरीपासून कस्टमर रिलेशन्सपर्यंत ही संस्था माझ्या अनुभवासह, कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली आहे. या ठिकाणच्या माझ्या सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे सर्व पाठिंब्याबद्दल आभारी आहे. हा सुंदर अध्याय संपत असताना, मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे. धन्यवाद, अॅक्सिस बँक!"
दरम्यान, अॅक्सिस बँकेतील उत्तम करिअर केल्यानंतर आता पुढे काय? याबाबत मात्र अमृता फडणवीस यांनी अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण तरीही त्या पर्यावरण कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या तसंच आता गायिका म्हणून कार्यरत आहेतच. पण या गोष्टींना करिअर म्हणून त्यांनी घोषित केलेलं नाही. त्यामुळं भविष्यात जर त्यांनी याबाबत काही घोषणा केली तर त्यांच्यासाठी हे करिअरचं दुसरं पर्व ठरु शकेल. पण अमृता फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या या पोस्टर अनेक युजर्सनं संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात (२०१४-२०१९) राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्र पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची पगाराची खाती आणि इतर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकांमधून उदा. SBI, बँक ऑफ बडोदा इ. मधून काढून ती अॅक्सिस बँकेत (खासगी बँक) वळवण्याचा निर्णय घेतला होता. यामागं अमृता फडणवीस यांच्या पदाचा प्रभाव असल्याचा आणि पदाचा गैरवापर करून बँकेला फायदा पोहोचवल्याचा आरोपही झाला होता. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तोटा झाल्याचंही म्हटलं गेलं होतं. मोहनीष जबलपुरे यांनी या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. सन २०१७ मध्ये सरकारकडून एका परिपत्रकाद्वारे पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत हलवली होती. त्यानंतर २०२० मध्ये ठाकरे सरकारने ही खाती पुन्हा HDFC आणि इतर बँकेत हलवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.