Anand Paranjape enters in Shivsena : विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानं नाराज असलेल्या आनंद परांजपे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्या उपस्थितीत त्यांचा मुंबईत पक्ष प्रवेश पार पाडला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आनंद परांजपे म्हणाले, "शिवसेनेतून सुरु झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कार्यरत होण्याचं भाग्य मला मिळालं. मी कुठल्याही पदाच्या लालसेनं कुठल्याही अपेक्षेनं शिवसेनेत पुन्हा आलेलो नाही. मला संघटनेत काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेचा आत्मा हे संघटन आहे. शिवसेनेत संघटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळं शिवसेनेत माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली तर ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. शिवसेनेत कार्यरत होऊन चांगल्याप्रकारचं संघटन उभारण्याचा मी प्रयत्न करेन. आज माझी घरवापसी होत आहे, त्यामुळं शिवसेनेचं बाळकडू समाजकारणात राजकारणात घेऊनच माझा प्रवास सुरु झाला. त्यामुळं येणाऱ्या काळात मी उत्तम कार्यकर्ता म्हणून मी काम करेन"
राष्ट्वादी काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असल्याच्या चर्चांवर आनंद परांजपे यांनी म्हटलं की, माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. कुठल्याही अपेक्षेनं मी राष्ट्रवादीत काम केलं नाही. संघटनेनं माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी केलं. काही क्षणापूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आणि आता शिवसेनेत आहे म्हणून मी नाराज आहे असं म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर मी कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही, मी तिथं १४ वर्षे काढली ती आनंदात काढली. त्यामुळं माझ्या मनात कुठलंही दुःख किंवा शल्य नाही, असं यावेळी आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आनंद परांजपे यांचे वडील प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६६ पासून शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते नगरसेवक, त्यानंतर चार वेळा खासदार झाले. त्यांच्या पश्चात २००८ च्या ठाण्याच्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांना शिवसेनेनं खासदारकीचं तिकीट दिलं आणि निवडून आणलं. त्यानंतर २००९ मध्ये ते कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१२ मध्ये आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर तब्बल १४ वर्षे राष्ट्रवादीत घालवल्यानंतर आज पुन्हा एकदा आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.