

Rupali Chakankar: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज आर्थिक व्यवहार प्रकरणी ईडीकडून ८ तास कसून चौकशी झाली. चौकशीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरल्यानं त्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यावेळी त्यांनी चाकणकर कुटुंबाचा आध्यात्मिक गुरु राहिलेल्या खरातचा एकेरी उल्लेख केला तसंच चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव न दिसता अगदीच स्मितहास्य करत त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
चाकणकर म्हणाल्या, "जेव्हा जेव्हा आम्हाला चौकशीसाठी आम्हाला बोलावलं गेलं तेव्हा आम्ही उपस्थित राहिलो आहोत. यापूर्वी अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या हे मला आवर्जुन सांगायचं आहे. आज सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंतच्या वेळेत माझी चार साडेचार तासांची चौकशी झाली. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं दिली आहे. पहिल्या दिवसापासून मी जे सांगत आले आहेत ते पुन्हा एकदा सांगते की खरात प्रकरणात खरातशी आमचा कुठलाही आर्थिक व्यवहार नव्हता. कुठल्याही जमिनीच्या व्यवहारात आम्ही पार्टनर नव्हतो, त्यामुळं खरंतर बाकीचे प्रश्नच उद्भवत नाहीत. खरंतर आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातच मला प्रश्न विचारले गेले पण कुठलाच आर्थिक व्यवहार नव्हता, त्यामुळं त्यांना काही पुढचे प्रश्न उद्भवले नाहीत. यापूर्वी झालेल्या एसआयटीचे आणि आता ईडीचे प्रश्न वेगळे होते, त्यांना आम्ही प्रत्येकवेळी सहकार्य केलेलं आहे. इथून पुढेही कधी सहकार्य लागलं तर करु"
यापूर्वी मी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा सांगते की, समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावानं जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती. हे दोघेही कधीही समता पतसंस्थेत गेले नव्हते, ही पतसंस्था कुठे आहे? हे देखील त्यांना माहिती नाही. त्यामुळं त्यांच्या खात्यांवरील व्यवहारांचा ओटीपी देखील खरातकडे जात होता. या दोघांच्याही या खात्यांवर कुठेही सह्या देखील नव्हत्या. केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लोकांची बनावट खाती या पतसंस्थेत खोलली गेली होती. ज्या व्यक्तींना चालता सुद्धा येत नाही अशा व्यक्तींची देखील बनावट खाती ही समता पतसंस्था आणि आणखी एका पतसंस्थेत काढलेली आहेत. त्यामुळं ही सर्व खाती खोटी आहेत. त्यामुळं आमचा खरातशी कोणताही आर्थिक आणि जमिनीचाही व्यवहार झालेला नाही.
गुवाहाटीच्या फोटोमध्ये माझ्या कुटुंबियांसोबत खरातचं कुटुंब दिसतं आहे. पण आम्ही खरातसोबत प्रवास केलेला नाही, खरात त्याच्या कुटुंबासह आणि अनेक ट्रस्टी मेंबरसोबत दर्शनासाठी तिथं पोहोचला होता. माझ्या कुटुंबानं त्यापूर्वी कधीही इथं येऊन दर्शन केलेलं नव्हतं. पण त्यावेळी आमचा भाव असा होता की, आपल्याला जर आपल्या गुरुसोबत दर्शन करता आलं तर तो आध्यात्मिक भाव ठरतो, म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्याहून प्रवास करुन गेलो होतो. त्यानंतर तिथं आम्ही सोबत दर्शन घेतलं होतं, त्यानंतर त्यांचा प्रवास वेगळा आणि आमचा प्रवास वेगळा झालेला होता. त्यानंतर १७ तारखेला अटक झाल्यानंतर आम्हाला कळलं की, तो आरोपी आहे. तोपर्यंत खरंतर अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याला गुरु मानत होते, त्याच्या दर्शनासाठी जात होते तीच आमचीही भावना होती. त्यामुळं एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती तो प्रामाणिक श्रद्धेचा भाव होता, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी गुवाहाटीतील फोटोबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.