Mumbai News : चार वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे एकापाठोपाठ एक बडे नेते सोडून जात असल्यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के सहन करावे लागत आहे.
अशातच सहा खासदारांनाच फोडण्यात यश आल्यानं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब होऊन आमदारही फुटल्याचा दावा करुन दहा दिवस होत नाही, तोच सचिन अहिर हेही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. यानंतर अपक्ष पण महाविकास आघाडीशी 'कनेक्ट' असलेल्या आणखी एका आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी बुधवारी(ता.१) शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची विदर्भात मोठी ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे.
किरण सरनाईक हे अमरावती शिक्षक मतदारंसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. यापूर्वी ते काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी संबधित राहिलेले आहेत. त्यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीशी घरोबा केला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी जोडले गेले आहेत. यामुळे एकाच महिन्याच्या आतच विदर्भात शिंदेंनी बच्चू कडू आणि आता किरण नाईक यांना फोडत आपली ताकद असतात.
मोठ्या राजकीय निर्णयावर किरण नाईक यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, या राज्यामध्ये शिवसेना काम करत आहे. शिवसेनेचे काम पाहून सहयोगी सदस्य काम करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. अमरावती शिक्षक मतदार संघातून सरनाईक निवडून आलेले आहेत. शिवसेना दिलेला शब्द पाळते असंही त्यांनी म्हटलं होतं.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. शिक्षकांच्या प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी ते काम करत आहेत. ते माझ्यासोबत काम करत आहेत. आता त्यांनी शिवसेनेचं सहयोगी सदस्य पद त्यांनी घेतलं आहेत. शिक्षकांच्या अनेक मागण्या होत्या, त्यांच्याकडे लक्ष दिले जाईल.’
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी प्रस्थापितांना घाम फोडला होता. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक शिक्षक मतदारसंघातून 3242 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. किरण सरनाईक यांना 12,433 मतं मिळाली तर श्रीकांत देशपांडे यांना 9191 मतं मिळाली होती.
एकीकडे मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना, दुसरीकडे पुण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख वसंत मोरे यांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुण्याच्या १३० ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी वसंत मोरे यांनी 'मातोश्री दर्शन' यात्रेचे आयोजन केले आहे.
सहा खासदार आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर, येत्या ६ जुलै रोजी हे ज्येष्ठ शिवसैनिक मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. "मरण्यापूर्वी एकदा तरी मातोश्री निवासस्थानी जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे," अशी भावना या ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली होती.
या भावनेची दखल घेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना या सर्व निष्ठावंतांना मातोश्रीवर घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय उलथापालथीत पुण्यातील ही 'मातोश्री दर्शन' वारी विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.