Archana Patil  Sarkarnama
मुंबई

Archana Patil on Result : निकालानंतर अर्चना पाटलांनी 20 वर्षांचा पट उलगडा : गावोगावी जाऊन मंगळसूत्राची शपथ घेत ‘आम्ही कोणाचाही खून केला नाही’ असे सांगत होते

Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाचे स्वागत करत अर्चना पाटील यांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 June : पवनराजे निंबाळकर यांच्या खून प्रकरणाचा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. त्यात पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नव्हती, असे कारण न्यायालयाने दिलले आहे. या निकालावर माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सूनबाई आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सत्याचा विजय झाला असून निकालामुळे आनंद आणि समाधान आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, गेली २० वर्षे आम्हाला तणाव सहन करावा लागला आहे. उगीच बेंबीच्या देटापासून ओरडलं म्हणजे एखादी गोष्ट खरी होत नसते. पण, आरोपामुळे आमचं संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त झालं. राजकीय नुकसान तर झालंच पण मानसिक त्रास खूप झाला. माझ्या सासऱ्याला, मुलाला जो त्रास झाला आहे, ते आठवून आज मला रडायला येत आहेत.

माझी मुलं लहान होती, नववीतील मुलाला घेऊन आम्हाला पद्मसिंह पाटील यांना भेटायला जेलमध्ये जावं लागायचं. आम्ही नवरा बायकोने (राणाजगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटील) राजकीयदृष्ट्या मोठं स्ट्रगल केलं आहे. निर्दोष असतानाही आम्हाला राजकीयदृष्ट्या मानसिक छळ भोगावा लागला आहे. त्याचाच परिपाक असा झाला की, मुलगा आणि मी मतदारसंघात, संपूर्ण जिल्ह्यात अधिक जोमाने लोकांची कामं करायाला सुरवात केली, असे अर्चना पाटील यांनी नमूद केले आहे.

त्या म्हणाल्या, सतत पाठीमागं दुःख, चीड आणि त्रास होता. प्रत्येक निवडणुकीत विरोधक तोच मुद्दा काढून बोलायचे. पहिल्या निवडणुकीनंतर मी तर अक्षरशः हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते आणि मंगळसूत्राची शपथा घेऊन ‘आम्ही कोणचाही खून केलेला नाही,’ असे सांगत होते. तसेच, आम्ही कारखान्याचे पाच रुपयेसुद्धा खालेले नाहीत, हेही स्पष्ट करत होते. आजच्या निकालामुळे हे सर्व आठवतंय.

आम्ही खूप स्ट्रगल केलं. पण, स्ट्रगलपेक्षा आम्हाला मानसिक त्रास खूप मोठा झाला. माझ्या मुलाच्या मनावर त्याचा परिणाम झाला, त्याचं खूप वाईट वाटतं. त्या त्रासामुळे माझ्या सासूबाई वारल्या. आज ते सर्व बोलायचा दिवस नाही. निकालास उशीर झाला आहे. पण, शेवट चांगला झाला आहे. सत्याचा नेहमी विजय होतो, आम्हाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे, त्याबद्दल न्यायदेवतेचे आभार मानते, असे अर्चना पाटील यांनी नमूद केले.

धाराशिव जिल्ह्याचेही नुकसान

पाटील म्हणाल्या, डॉ. पद्मसिंह पाटील हे एकेकाळी गृहमंत्री राहिले होते. पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. पण या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना खाली खेचण्यात आले, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नुकसान झाले. लातूरचा मुख्यमंत्री झाला, पण धाराशिवचे मुख्यमंत्रिपद गेलं. आमचं राजकीय नुकसान तर भरून निघणारच नाही. अर्थात आजच्या निकालाने आनंद आहे. पण, आम्ही सगळे त्या पलीकडे गेलो आहे. डॉ. पाटील हे आज ८५ वर्षांचे झाले आहे, त्याच्या जीवंतपणीच त्यांना न्याय मिळाला, याचं समाधान आहे. डॉक्टरांचा राजकीय वारसा आम्ही जपून ठेवला असून तो पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत.

निकालाला उशीर झाला; पण न्याय मिळाला

निकालाला उशीर झाला. पण आम्हाला न्याय मिळाला, याचे समाधान आहे. गेली २० वर्षे आम्ही कसे काढले आहेत, हे आम्हालाच माहिती आहे. राजकीयदृष्टया संपलो, असं वातावरण जिल्ह्यात केलं होतं. पण आम्ही त्यातून उभे राहिलो. आज आम्ही राजकीयदृष्ट्या चांगल्या ताकदीने उभे राहिलो आहोत, असेही अर्चना पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT