Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi News
Bhai Jagtap Latest Marathi News, Prasad Lad Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

विधान परिषद : भाजपच्या पाचव्या जागेचे गणित सोपे नाही.. 22 आमदारांना `पटवावे` लागेल!

ज्ञानेश सावंत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीचा (MLC election 2022) आखाडाही रंगणार असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने विनवण्या करूनही काँग्रेसने दोन्ही उमेदवार कायम ठेवले. भारतीय जनता पक्षाने सहावे उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची उमेदवारी मागे घेत आपले पाच उमेदवार रिंगणात ठेवले. दहा जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून काँग्रेसला एका जागेवरून माघार घेण्याचा निरोप पाठवला. तरीही काँग्रेस दोन्ही उमेदवारांवर ठाम राहिली. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या आमदारांची पळवापळवी होणार आहे. तसेच आपल्याच पक्षाच्या आमदारांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. (Prasad Lad Vs Bhai Jagtap fight for MLC election)

सध्याच्या संख्याबळानुसार पाचवा उमेदवार निवडून आणणे भाजपला सोपे नाही. राज्यसभा निवडणुकीत 11 मते फोडत भाजपने धनंजय महाडिक यांना विजयी केले. भाजपला राज्यसभा निवडणुकीत एकूण 123 मते मिळाली. विधान परिषदेसाठी 22 मते भाजपला बाहेरून आणावी लागणार आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्याने भाजपला सहजपणे चमत्काराची अपेक्षा आहे.

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 27 मतांचा कोटा आहे. शिवसेनेकडे सध्या 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे निर्धोकपणे निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे 53 आमदार असल्याने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनाही कोणतीच अडचण नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क मिळाला नाही तर राष्ट्रवादीची दोन मते कमी होऊ शकतात. तरी इतर अपक्षांच्या बळावर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवणे अवघड नाही. काॅंग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यावर एक उमेदवार चंद्रकांत हंडोरे सहज निवडून येतील. काॅंग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना 10 मतांची बाहेरून मदत लागणार आहे. शिवसेनेकडील बारा अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्या मदतीसाठी जगताप यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

भाजपकडे स्वतःच्या 106 आमदार आहेत. याशिवाय सहा अपक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांचे प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे हे सहज निवडून येऊ शकतात. त्यासाठी एकूण 108 मते त्यांना आवश्यक असतील. प्रसाद लाड निवडून येण्यासाठी त्यांना बाहेरून 23 मतांची गरज पडेल. मनसेचे मत त्यांच्या सोबत जाऊ शकते. त्यामुळे किमान 22 मतांची त्यांना व्यवस्था करावी लागणार आहे. राज्यसभेत केवळ 11 मते अपक्षांची मिळवून भाजपने विजय मिळवला होता. आता त्याच्या दुप्पट मतांची व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे.

विधान परिषदेसाठी मतांचा कोटी २७ (प्रत्येक उमेदवार)

भाजप १०६ (सहा अपक्ष आणि मनसेसह 113) राज्यसभेत मिळालेली मते 123

शिवसेनेचे संख्याबळ ५५

राष्ट्रवादी काँग्रेस ५३

काँग्रेस ४४

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT