विखेंची गुगली : राधाकृष्ण यांचे थेट अजितदादांना निमंत्रण तर सुजय म्हणतात शिवसेना चांगली...

राधाकृष्ण आणि सुजय विखे पाटील (Vikhe Patil) या दोघांनी परस्परविरोधी की सोयीची राजकीय लाईन घेतली?
Radhakrishna and Sujay Vikhe
Radhakrishna and Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील विखे कुटुंबाचे राज्यातील राजकारणात वेगळे स्थान आहे. मागील दोन दिवसांतील वेगवेगळ्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केलेली वक्तव्ये राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांची ही परस्परविरोधी अर्थ निघणारी राजकीय वक्तव्ये मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करणारी आहेत.

दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद शिवसेनेचे कौतुक केले. भाजपचा संघर्ष शिवसेनेच्या सत्तेशी असताना विखे यांनी सेनेवर वाहिलेली स्तुतीसुमने चर्चेची ठरली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी मी सेनेला सोडणार नसल्याचे त्यांचे वक्तव्ये तर अनेकांच्या भुवया उंचविणारे ठरले. "मला खासदार करण्यात 50 टक्के वाटा शिवसैनिकांचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही शिवसैनिकावर संकट आल्यास त्याला भाजपचा कार्यकर्ता मदतीला जाईल. पारनेर तालुक्यातील कोणत्याही शिवसैनिकावर संकट आल्यास त्याच्या पाठी मागे मी उभा राहिल. त्यामुळे माझ्यावर आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल," असे वक्तव्य त्यांनी केले होते. अर्थात त्याचे पडसाद उमटल्यानंतर हे आपण फक्त पारनेर तालक्यापुरेत बोललो होतो, अशी सारवासारव त्यांनी केली.

Radhakrishna and Sujay Vikhe
Video: अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे; राधाकृष्ण विखे पाटील

दुसरीकडे विखे पाटील आणि पवार कुटुंब यांचा राजकीय संघर्ष असताना राधाकृष्ण यांनी एका मुलाखतीत अजितदादांचे कौतुक केले. "उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे. देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे," असे म्हणत अजितदादांना निमंत्रण दिले. पितापुत्रांची ही वेगवेगळी लाईन अनेकांच्या लक्षात आली.

विखेंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीच्या जोरावर विखे गटाचे राजकारण नगर जिल्ह्यात चालते. व्यक्तीजवळ सत्ता असेल तरच लोकांचे प्रश्न सुटतील. त्यासाठी पक्ष बदलून का होईना पण सत्ता टिकवायची आणि त्यातून परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवायचे हे साधे गणित विखे गटाचे आहे. हा गट अहमदनगर जिल्ह्यासह नाशिकचा काही भाग व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात सक्रिय आहे. त्यामुळे विखे गटाचे कार्यकर्ते सर्वच पक्षात दिसून येतात. याचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे गटा-तटात व सोयऱ्या धायऱ्यांत विभागले गेले आहे.

Radhakrishna and Sujay Vikhe
सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

पारनेरमध्ये सुजय यांना शिवसेना का हवी?

पारनेर तालुका हा पूर्वी लोकसभेच्या उत्तर अहमदनगर जिल्हा मतदारसंघाचा भाग होता. या मतदार संघातून बाळासाहेब विखे पाटील हे सात वेळा खासदार राहिले. पारनेर तालुका हा पूर्वी कम्युनिस्टांचा गड होता. भास्करराव औटी व बाबासाहेब ठुबे यांच्या सारखे आमदार याच भागातून निवडून येत. विखे गटातील नंदकुमार झावरे हेही दोन वेळा या मतदार संघातून काँग्रेसचे आमदार होते. मात्र ते पूर्वी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते होते. माजी आमदार भास्करराव औटी यांचे चिरंजिव विजय औटी हे तीन वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार राहिले. ते पूर्वी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष होते. अभ्यासू आमदार म्हणून हे चारही आमदार महाराष्ट्राला परिचित आहेत. या तालुक्यातील लोक मोठ्या संख्येत शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत. बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोकसभा मतदार संघातील हा भाग असल्याने त्यांचा या तालुक्यात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी पारनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली.

मागील विधानसभा निवडणुकीत विजय औटी यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके आमदार झाले. नीलेश लंके हे पूर्वी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष होते. मात्र त्यांनी त्यांच्या बरोबर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेले. नीलेश लंके हे कोविड काळानंतर राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे विखे विरुद्ध लंके असा संघर्ष पारनेर तालुक्यात निर्माण होऊ लागला आहे. अशातच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची निवडणूक जवळ येत आहे. यात केवळ पारनेर तालुक्यापुरती भाजप-शिवसेना-काँग्रेस अशी नवी आघाडी तयार करण्याचा घाट सुजय विखे पाटील यांनी घातला आहे. त्यामुळे रांजणगाव येथील एका खासगी कार्यक्रमाला या आघाडीत दिसतील असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यात माजी आमदार विजय औटींचाही समावेश होता.

Radhakrishna and Sujay Vikhe
2024मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार का?

निलेश लंकेंचा बंदोबस्त करण्याची रणनीती..

सुजय विखे पाटील यांनी भाषणात उद्धव ठाकरे व पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांवर स्तुतिसुमने उधळी गेली. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजय औटी यांच्या पराभवाविषयी सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने नव्हे, चुकीच्या व्यक्तीच्या येण्याने वाईट बदल होतात. पारनेर तालुक्यातील शासकीय अधिकारीच सुरक्षित नाहीत तेथे सामान्य लोकांची काय अवस्था, अशी टीकाही त्यांनी केली होती. या संपूर्ण भाषणात त्यांनी पारनेर तालुक्यातील मागील तीन वर्षांत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाल्याचे सांगताना नाव न घेता आमदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली. मागील महिन्यात पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या नगरसेवकावर दोन गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच संदर्भ देत त्यांनी "पारनेर तालुक्यातील कोणत्याही शिवसैनिकावर संकट आल्यास त्याच्या पाठी मागे मी उभा राहिल. त्यामुळे माझ्यावर आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल," असे आश्वासनही पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांना दिले होते.

राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले

विखे गटानुसार अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण व जिल्ह्याबाहेरील राजकारण हे स्वतंत्र आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार म्हणून वक्तव्य करताना दिसतात. यात ते अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकत्र येऊन सत्ता तयार करावी अशी अपेक्षा व्यक्त करतात. मात्र याच मुलाखतीत त्यांना विखे व पवार कुटुंबातील संघर्षावर प्रश्न विचारल्यावर ते अधिक सावध होऊन उत्तरे देताना दिसले. या मागेही विखे गटाचे राजकारण आहे, असेच म्हणावे लागेल.

Radhakrishna and Sujay Vikhe
महाडिकांचा असाही विजय; विधान परिषद घालवली पण राज्यसभा मिळवली!

विखे-थोरात गटाचा संघर्ष

याच मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना काय सल्ला द्याल असे विचारताच त्यांनी काहीही सल्ला देणार नसल्याचे सांगत टाळले. अहमदनगर जिल्ह्यात विखे व थोरात असे दोन गट आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील राजकारणापासून सुरू झालेले हे दोन गट आता जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचे आहेत. थोरातांच्या नातेवाईकांचा राजकीय गोतावळा मोठा आहे. यात गडाख, काळे, राजळे, तांबे, कोते, घुले आदींचा समावेश आहे. बाळासाहेब थोरात हे पहिल्यापासून अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार यांना जवळचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर थोरात राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती मात्र त्यांचे वडील माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांच्या सांगण्यामुळे ते काँग्रेसमध्येच एकनिष्ठ राहिले. बाळासाहेब विखे यांचा शरद पवारांशी व राधाकृष्ण विखे यांचा अजित पवारांशी संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. आता त्याच अजित पवारांना सोबत घेण्याच्या विखेंच्या तयारीने अनेकांना आश्चर्य वाटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com