Ashok Chavan Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan in BJP : भाजप प्रवेशानंतरही अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच; म्हणाले 50 वर्षांची सवय सुटणार नाही...

The beginning of a new political journey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या भूमिकेशी सहमत होऊन आजपासून माझ्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात.

Anand Surwase

Mumbai News : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आपला काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चव्हाण यांनी आज (मंगळवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेशी सहमत होऊन मी आजपासून माझ्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी भाजपचा उल्लेख करण्याऐवजी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काँग्रेसचा उल्लेख केला. त्यामुळे पक्ष प्रवेशाच्या या कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

अशोक चव्हाण यांनी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी अशोक चव्हाण यांनी आशिष शेलार यांचा मुंबई भाजपचे अध्यक्ष असा उल्लेख करण्याऐवजी थेट मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख केला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, त्यावेळी अशोक चव्हाण यांची अनवधानाने झालेली चूक लक्षात येताच फडणवीसांनी तत्काळ चव्हाण यांना शेलार हे काँग्रेसचे नाही, तर भाजपचे अध्यक्ष असल्याचे सूचित केले.

त्यावर अशोक चव्हाण यांनीदेखील 50 वर्षांच्या सवयीचा हा परिणाम आहे. भाजपमध्ये आल्यानंतर माझी पहिलीच पत्रकार परिषद होत आहे. माझा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे काँग्रेसचा उल्लेख करण्याची सवय अद्याप गेली नाही. त्यामुळे स्वीच करायला थोडा वेळ द्यावा लागेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाण म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाने मी माझ्या आयुष्यातील नवीन राजकीय वाटचाल सुरू करत आहे. माझ्या 38 वर्षांचा प्रवास मी आज बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ, सबका विकास हे ब्रिद घेऊन जे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या कार्यातूनच स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन मी राज्यात आणि देशात विकासाचे काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आजपर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच पुढे जात आहे. मी जिथे होतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले आहे, आता भाजपमध्येही तसेच काम करेन, माझ्या अनुभवाचा वापर भाजप पक्षवाढीसाठी करणार आहे. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असेही चव्हाण या वेळी म्हणाले.

मी आजपासून सकारात्मक कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी मी बावनकुळे यांच्याकडे भाजपमध्ये पक्ष प्रवेशाची फी दिली आहे, त्याची पावतीदेखील घेतली आहे. त्याप्रमाणे यापुढेदेखील मी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचेही चव्हाण या वेळी म्हणाले. तसेच पक्षात काम करत असताना आपण केवळ विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणार असून, पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यानिमित्ताने दिली.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT