Ashok Kharat Case| BJP Targets Rupali Chakankar Sarkarnama
मुंबई

Ashok Kharat Case : भाजपनेही रुपाली चाकणकरांची साथ सोडली; अडचणीत सापडलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांची खुर्ची गेल्यात जमा

BJP Targets Rupali Chakankar : अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ तर त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचा आणि त्याच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार करतानाचे चाकणकरांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 20 Mar : दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचं शारीरिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तर अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची मोठी कोंडी झाली आहे.

अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ तर त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचा आणि त्याच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार करतानाचे चाकणकरांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व फोटावरून विरोधक चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे.

अशातच आता भाजप देखील चाकणकर यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चाकणकरांवर टीका केली आहे.

तुषार भोसलेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, याच चाकणकर बाई , काही दिवसांपूर्वी ज्ञान पाजळत होत्या की, आम्ही महिलांना पोथी-पुराणात अडकवून ठेवले. अहो, पण तुमच्यासारखे असल्या भोंदूंच्या नादात अडकण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन आणि अनुकरण करणे हे कितीतरी पटीने चांगले आहे. म्हणून आमच्या माय-माऊलींना उपदेश देण्यापेक्षा आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करा, अशा शब्दात भोसलेंनी चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

त्यामुळे आता मित्रपक्ष असलेला भाजप देखील चाकणकरांच्या विरोधात गेल्यानं त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकारी रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील चाकणकर यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता चाकणकरांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी देखील चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पटेल म्हणाले, "भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर कारवाई केली पाहिजे आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत. त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कार्यवाही करणार आणि ते येणाऱ्या काळात दिसेल." त्यामुळे आता चाकणकर यांची खुर्ची गेल्यात जमा असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, रुपाली चाकणकर खरातचे पाय धुतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील कार्यक्रमात केलेलं वक्तव्य व्हायरल होतंय. ज्यामध्ये समाजातील महिलांना संविधानाची जाणीव होणे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य त्या करत आहेत. तर आपण महिलांना पोथ्या-पुराणात अधिक अडकवले, पण संविधान वाचणे आपल्याकडून राहिले. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या, असं चाकणकर बोलल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT