girish mahajan nana patole bhaskar jadhav vijay wadettiwar sarkarnama
मुंबई

Video Assembly Session : वडेट्टीवार, जाधव, पटोले सरकारवर तुटून पडले, महाजनांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं अन्...; नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

विधानसभेत विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार भास्कर जाधव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विषयाच्या चर्चेला मंत्री उपस्थित नसल्यावरून चांगलीच खरडपट्टी काढली.

यानंतर मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत सरकारची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

झालं काय?

साताऱ्यातील झाडाणी येथील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण काढून अधिकाऱ्यानं ताब्यात घेतल्या. तसेच, वनजमिनींवर अनधिकृत रस्ते बनवण्यात आले आहेत. पण, या चर्चेला महसूल आणि वन विभागाचे मंत्री उपस्थित नाहीत. त्यामुळे विधानसभा 10 मिनिट तहकूप करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) म्हणाले, "विरोधी पक्षनेते भाषण करत आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बसलं पाहिजे. यापूर्वीचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याच्या भाषणाला बसत असत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील एकही जण नाही."

"त्याचबरोबर विरोधी पक्षनेते करत असलेल्या चर्चेसंबंधित मंत्रिही उपस्थित नाहीत. काय चाललंय काय... विरोधी पक्षनेत्याला तुम्ही टाळत असाल, तर सभागृह कशाला चालवत आहात.. एकतर नियमबाह्य सभागृह आणि नियमबाह्य कामकाज चालते. आम्ही खाली मान घालून बसलो आहोत. मंत्री येत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज थांबवा," अशी मागणी करत भास्कर जाधवांनी हल्लाबोल केला.

तर, नाना पटोले ( Nana Patole ) यांनी म्हटलं, "कुठलं कामकाज किती वाजता चालणार हे मंत्र्यांना माहिती आहे. तीन तोंडाचं इंजिन आहे. एकतरी इंजिन सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे. लोकशाहीच्या व्यवस्थेची सरकारला मान्यता नाही, असं म्हणायचं का? सरकार गंभीर नाही."

तेव्हा, तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी वडेट्टीवार यांना भाषण सुरू करावे, असं दर्शवलं. पण, वडेट्टीवार म्हणाले, "काय चालू करू... कुणापुढे बोलू... आरोग्यमंत्री सभागृहात होते, तेही निघून गेले. अशी पद्धती नाही. ही नवीन पद्धत सभागृहात आणत आहात. सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणी थांबवलं होतं. बाशिंग बांधून आणि कोट शिवून बसलेल्यांना मंत्री करायला हवे होते. 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा."

यावेळी महसूलमंत्री आणि आरोग्यमंत्री विधानपरिषदेत असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. "महसूलमंत्री आणि आरोग्यमंत्री हे विधानपरिषदेत प्रश्नांना उत्तरे देत आहेत. वडेट्टीवार आणि जयंत पाटील हे ज्येष्ठ सदस्य आहेत. चर्चा करताना संबंधित खात्याचा मंत्री हजर असला पाहिजे, असा नियम कुठेही नाही. उद्धव ठाकरे दोन वर्षे कुठे चर्चेला हजर राहिले?" असा सवाल गिरीश महाजन यांनी भास्कर जाधव यांना उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT