Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure  Sarkarnama
मुंबई

Gholap Increased Thackeray Tension : बबनराव घोलपांनी वाढविले ठाकरे गटाचे टेन्शन

Vijaykumar Dudhale

Mumbai News : मुंबईतील शिवसेना भवनात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला माजी मंत्री बबनराव घोलप हे येणार नसल्याची माहिती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज असलेले घोलप हे येत्या रविवारी मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे बबनराव घोलप हे ठाकरे गटाचे टेन्शन वाढविणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Babanrao Gholap will increase the tension of the Thackeray group)

माजी खासदार भाऊसाहेब वाक्‌चौरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यावेळी त्यांना शिर्डीतून लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक, माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. संपर्कप्रमुख या नात्याने त्यांनी शिर्डीत मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्वाकडून शिर्डीतून वाकचौरे यांना हिरवा कंदिल दाखविल्याने घोलप हे नाराज झाले आहेत.

शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून बबनराव घोलप यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना कामाला सुरुवातही करायला सांगण्यात आले होते. मात्र, त्या अनुषंगाने घोलप यांनी शिर्डीत कामालाही सुरुवात झाली. पण, काही दिवसांपूर्वी वाक्‌चौरे यांनी पक्षात प्रवेश केला आणि तेथून घोलप आणि वाक्‌चौरे यांच्यात शिर्डीवरून रस्सीखेच सुरू आहे. तसेच, गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकचा दुष्काळी दौरा केला होता. त्यात डावलण्यात येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी बबनराव घोलप यांची भेट घेऊन हा वाद मिटविण्यात येईल, असे सांगितले होते. मुंबईत आज शिवसेना भवनात शिर्डीतील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यात घोलप की वाक्‌चौरे या वादावर चर्चा होणार आहे. त्यानंतरच उमेदवारीचा निर्णय होणार आहे.

एकीकडे अनेक नेते पक्ष सोडून जात असताना नाशिकमधील देवळालीचे माजी आमदार बबनराव घोलप हे ठाकरेंसोबत राहिले होते. शिर्डीतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. मात्र, वाक्‌चौरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारीवर दावा केल्याने घोलप हे नाराज झाले आहेत. त्यातून त्यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. घोलपसमर्थक येत्या रविवारी मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT