Balasaheb Thorat-satyajeet tambe Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरातांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन : ‘सत्यजित तांबेंना उमेदवारी...’

नाशिक पदवीधर मतदासंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी तांबे यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीच अपक्ष अर्ज भरला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचे बंड हे पूर्वनियोजित आहे की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण, तांबे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे (Congress) विधीमंडळातील नेते तथा सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपच्या बड्या नेत्याला फोन केल्याचे सांगितले जात आहे. सत्यजित तांबे यांना भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी विनंती थोरात यांनी संबंधित नेत्याला केल्याची माहिती आहे. (Balasaheb Thorat's phone call to the big leader of BJP)

नाशिक पदवीधर मतदासंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला होता. मात्र, ऐनवेळी तांबे यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीच अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे सहाजिकच थोरात, तांबे आणि काँग्रेस-भाजप अशी चर्चा रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात यांना उद्देशून ‘सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते जास्त दिवस बाहेर ठेवू नका; नाहीतर आमची नजर त्यांच्याकडे जाते’ असे म्हटले होते. त्यानंतर सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या बड्या नेत्याला फोन करून उमेदवारी न देण्याची गळ घातल्याचे सांगितले जाते. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

सत्यजित तांबे यांना भाजपची उमेदवारी देण्यात येऊ नये अथवा त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेऊ नये, अशी विनंती थोरात यांनी संबंधित भाजप नेत्याला केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या फोननंतर नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगितले जात आहे. तसेच, आमच्या कुटुंबातील अंतर्गत कलह असेल तर आम्ही कुटुंबात चर्चेच्या माध्यमातून सोडवू, असेही त्यांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांची कन्याही राजकीय क्षेत्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली तर भविष्यात ती अडचणीची ठरू शकते, त्यामुळेच तांबे यांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अशी गळ थोरात भाजप नेत्याला घातल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT