Konkan Politics Sarkarnama
मुंबई

Barsu Refinery : बारसू रिफायनरीसाठी बंद पडद्याआडचे ‘उद्योग’! कोकणवासीय वाऱ्यावर...

Konkan Politics : आमदार राजन साळवी हे तर प्रकल्पासाठी कायम पायघड्या घालण्यासाठी उभे असल्याचे दिसते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : वादग्रस्त मातीपरीक्षणानंतर बहुचर्चित बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प थंड बस्त्यात गेल्याचे चित्र असले तरी कोट्यवधींच्या अलिखित व्यवहारामुळे या प्रदूषणकारी प्रकल्प कधीही कोकणवासीयांच्या मानगुटीवर बसवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी प्रकल्पाला विरोध करण्याचे चित्र उभे करणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामागे असल्याची माहिती सूत्रांकडून कळते.

कोकणात अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पकड असून, त्यांना नाराज करून हा प्रकल्प पुढे रेटणे शक्य नसल्याने शिंदे सरकारमधील मंत्र्याने बंद दाराआडचे ‘उद्योग’ सुरू ठेवले आहेत. परिणामी शिवसेना आणि या मंत्र्यांच्या अलिखित व्यवहाराने कोकणवासीय मात्र वाऱ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना नाणार येथे होणारा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेत आपण कोकणातील लोकांच्या पाठीशी असल्याचे दाखवले होते. पण, याचा अर्थ तो प्रकल्प कोकणातून हद्दपार झाला नव्हता, तर तो बाजूलाच बारसू सोलगाव परिसरात उभारण्याचा घाट घातला गेला होता. काही महिन्यांपूर्वी झालेले माती हे त्याची साक्ष देते. आतासुद्धा हे मातीपरीक्षण प्रकल्पाला साजेसे करून पुढच्या कार्यवाहीसाठी योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे. आताच हा प्रकल्प जबरदस्तीने सुरू केल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचे मोठे परिणाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपलासुद्धा भोगावे लागतील, या भीतीने सध्या आस्ते कदम जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बंद दाराआडचे कवित्व...

या निर्णयाबरोबर सध्या शिंदे सरकारच्या मंत्र्याने रिफायनरीवरची आपली नजर जरासुद्धा ढळू दिलेली नाही. यासाठी त्यांनी आतून मातोश्रीशी आपली व्यवहारिक बोलणी सुरू ठेवलीत, असे समजते. नाणार रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री असतानाच उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहून हा प्रकल्प कोकणातच राहील, याची घेतलेली काळजी हे या बंद दाराआडचे कवित्व आहे. त्यामुळे हा प्रकल्प लोकांना नको असेल तर आम्ही त्यांच्या मागे आहोत आणि हवा असेल तरीसुद्धा आमचा त्यांना पाठिंबा असेल, हा दुतोंडीपणा ठाकरे शिवसेनेने कायम ठेवला आहे.

मातोश्रीला साजेशी अशीच त्यांची वाटचाल...

लाखो कोटींची रिफायनरी ही राजकारण्यासाठी सोन्याची कोंबडी असून, त्यासाठी कोकणातील माणसे मेली किंवा जगली काय त्यांना काही फरक पडणार नाही. यासाठी शिंदेंची किंवा उद्धवची शिवसेना यांना हा प्रकल्प हवा आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ज्या राजापूर तालुक्यात हा प्रकल्प होणार आहे तेथील आमदार राजन साळवी हे तर प्रकल्पासाठी कायम पायघड्या घालण्यासाठी उभे असल्याचे दिसते.

उघडपणे विरोध करायचा, पण आतून त्यांचे उद्योग वेळोवेळी रिफायनरीच्या बाजूने असल्याचे समोर आले आहे. कधीही त्यांनी ठाम विरोधाची भूमिका घेतल्याचे दिसलेले नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विराधावेळीसुद्धा हीच वरवर विरोधाची भूमिका घेत साळवी यांनी आतून आपली आर्थिक पोळी भाजल्याची कामे समोर आली होती. तेच खासदार विनायक राऊत यांच्या बाबतीत दिसते. ते यात आतपर्यंत गुंतले असल्याचे दिसत नसले तरी सावध पवित्रा घेत मातोश्रीला साजेशी अशीच त्यांची वाटचाल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंकडे ग्रामस्थ आशेने बघताहेत...

रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा जोरदार विरोध आहे. मातीपरीक्षणावेळी झालेल्या आंदोलनात प्रसंगी पुरुषांसह महिलांनी मारहाण सहन केली होती. दाखल झालेले गुन्हे, तुरुंगवारी, सततची चौकशी इतका सारा मनस्ताप सहन करूनही त्यांचा विरोध तसूभरही कमी झालेला नाही. विशेष म्हणजे आजही हे ग्रामस्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे आशेने बघताहेत. यासाठी गेली अनेक महिने ते मातोश्रीशी भेट मागत आहेत, पण खासदार विनायक राऊत तसेच संजय राऊत यांच्याकडे भेटीसाठी वारंवार मागणी करूनही टाळाटाळ केली जात आहे. यामुळेच आता उद्योगमंत्री आणि मातोश्रीची आतून व्यवहाराचे उद्योग झाल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळताना दिसत आहे.

ठाकरेंची विरोधासाठी कडक भूमिका कधी ?

ग्रामस्थांची बाजू मांडत रिफायनरीचे दुष्परिणाम सातत्याने मांडणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे. अजूनही त्यांच्या मुलाला नोकरी मिळालेली नाही. तसेच बारसूच्या आसपासच्या जमिनी या सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सातबारा उताऱ्यांवरून उघड झाले आहे. हे कमी म्हणून की काय, आजही पोलिसांच्या सततच्या चौकशीचा ससेमिरा ग्रामस्थांच्या मागे कायम आहे. अशा विचित्र कोंडीत बारसू सोलगावचे गावकरी सापडले असताना त्यांना मातोश्रीकडून आशा वाटत होती. पण, आता महिने उलटून जात असताना उद्धव ठाकरे विरोधाची कोणतीही कडक भूमिका घेण्यास तयार नसल्याने उद्योगमंत्री आणि मातोश्री यांच्यात बंद दाराआड व्यवहार सुरू असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT