Suhas Samant resigns as Shiv Sena union president after BEST Co-op Bank election defeat. Sarkarnama
मुंबई

BEST Election : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी; ठाकरेंच्या शिलेदाराचा राजीनामा

Suhas Samant Resigns After BEST Co-op Bank Election Defeat : बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत हे संघटना आणि शिवसेनेतील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Rajanand More

Impact of BEST Election Loss on Shiv Sena’s Workers’ Union : मुंबईतील बेस्ट पतपेढीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. या पॅनेलला 21 पैकी एकही जागा न मिळाल्याने भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजकीय वार केले जात आहेत. त्यातच आता हा पराभव जिव्हारी लागल्याने ठाकरेंच्या शिलेदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरेंना पाठविल्याचे समजते. सामंत यांच्या नेतृत्वाखालीच उत्कर्ष पॅनेलच्या माध्यमातून पतपेढीची ही निवडणूक लढविण्यात आली होती.

प्रचारादरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. पतपेढीत मागील नऊ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे लाड म्हणाले होते. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाला नोटीसही धाडण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच ऐरणीवरही आला होता.

पराभवानंतर सामंत यांनी दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुकीत पैशांचा प्रचंड ओघ होता. त्यासमोर आमचा निभाव लागला नाही, अशी टीका सामंत यांनी केली होती. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून या निवडणुकीत मोठा पैसा लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. कामगार पैसे घेतील, पण आपल्यालाच मते करतील, असे आपल्याला वाटल्याचेही त्यांनी म्हटले होते.

आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडल्याचे सुहास सामंत म्हणाले होते. त्यानंतर आज सामंत यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनाम्याचे पत्र पाठवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सामंत यांचा राजीनामा स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सुहास सामंत हे बेस्ट संघटना आणि शिवसेनेतील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT