Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडली. यात अजित पवारांसह निष्ठावान नेते आणि आमदारांनी अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची साथ सोडत बंडाचं निशाण फडकवलं. मात्र, या बंडानंतरही हार मानतील ते पवार कसले. शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी बैठका, दौरे, मेळावे यांसह बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच सभांचा धडाका लावला.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हावरील दावे- प्रतिदाव्यांवरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच आता पवार पुन्हा एकदा सभा गाजवणार आहेत. येवला, कोल्हापूर, बीडनंतर आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची(Sharad Pawar) तोफ धडाडणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी ही सभा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल होतात, पण शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेत दसरा मेळाव्यावरूनही चांगलंच राजकारण तापलं होतं.
अखेर दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटाकडून मेळावे घेण्यात आले होते. याच दिवशी बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील मेळावा घेतात. आता यात भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवारांच्या पुण्यातील सभेने होणार असल्याची माहिती असून, या यात्रेची सांगता नागपुरातील शरद पवारांच्या सभेने होणार आहे. निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर लढाई सुरू आहे. याचवेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला खिंडीत पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे. त्यात अजितदादांचा पुण्यावर कायमच दबदबा राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवारांनी राज्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडकडे आपला मोर्चा वळविला आहे.
शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवारांकडे (Ajit Pawar) विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आले, पण सव्वा वर्षभरातच त्यांनी तडकाफडकी या पदाचा राजीनामा देतानाच थेट सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यात अजित पवारांसोबत काही वरिष्ठ नेतेमंडळी आणि ४० आमदारही आले. भाजप-शिवसेना सरकारमध्ये अजितदादांसह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर आता पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.
दसऱ्याचा दिवस हा मेळावे, सभांतील राजकीय आरो-प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. या दिवशी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray),मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील सभा घेतील. ते या सभेत काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.