Nagar News : सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर नगरमध्ये अज्ञात तिघांनी प्राणघातक हल्ला केला. हेरंब कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कुलकर्णी यांची प्रकृती आता स्थिर आहे. हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यामुळे नगरमधील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी संघटनांनी चालवली आहे. (Assault on social activist Heramb Kulkarni)
हेरंब कुलकर्णी हे नगरमधील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हेरंब कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी वाहनावरून घरी येत होते. त्यावेळी नगर शहरातील रासनेनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. अनेकदा ते आपल्या साहित्याच्या माध्यमातून राजकीय भाष्यही करत असतात. मागील आठवड्यात त्यांची एक कविता व्हायरल झाली होती.
हल्लेखोरांनी हेरंब कुलकर्णी यांचे वाहन अडवले. त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉडने हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला चढवला. यात कुलकर्णी यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांचे सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही बेदम मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. हेरंब कुलकर्णी हे सामाजिक, शैक्षणिक विषयावर नेहमीच ठोस भूमिका घेतात. प्राथमिक शिक्षणावर त्यांनी आदिवासी भागात केलेल्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. तसेच अकोले येथे दारूबंदीवर चळवळ उभारली होती.
सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी शाळा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी भूमिका घेतली आहे. या हल्ल्यामागे तेच तर कारण नाही ना, याचा शोध तोफखाना पोलिस घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.