Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या केलेल्या अवमानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस विरोधात राळ उठवली जात असतानाच महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.
आता यावरुनच ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपला डिवचलं आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचं हिंदुत्व मान्य नव्हतं असा खळबळजनक दावा केला आहे.
संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांना भाजपसह शिंदे गटावरही जोरदार हल्ला चढविला. राऊत म्हणाले, सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
...हा विचार भाजपला मान्य आहे का?
सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद स्वीकारला. भाजप म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही,हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का? असा थेट सवालही त्यांनी केला.
आम्ही सावरकरांचं हिंदु्त्व स्वीकारलं. सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनाही शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले, असं सांगतानाच सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे अशी घणाघाती टीकाही राऊतांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या आज(दि.२) रोजी होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील पहिल्या संयुक्त सभेला प्रचंड गर्दी होईल अशी शक्यता आहे. या सभेला उद्धव ठाकरेंसह आघाडीतील महत्त्वाचे नेते असतील. मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही सभेला येतील. ही महाविकास आघाडीची सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी नको असंही राऊत म्हणाले.
“सावरकरांनी शेडी-जानव्याचं हिंदुत्व स्वीकारलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेलं आवडत नव्हतं. मग शिंदे दाढी काढणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की, दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. मग कुणीही असो. मग आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? तुम्ही सावरकरांची विचारयात्रा काढताय. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं. त्यांचं सगळं साहित्य वाचावं. भाजपालाही सावरकर विचारांचं पारायण करायची गरज आहे. आणि मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर यात्रा काढावी असा टोलाही राऊतांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.