Maharashtra BJP politics : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या कारवाईत भाजपप्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे चिटणीस अजित आचरेकर याला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छापा टाकत तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त केले असून या प्रकरणात आचरेकरसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच अजित आचरेकर यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात चिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे या अटकेमुळे भाजपची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डीआरआयच्या माहितीनुसार, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून अंड्याच्या आकाराच्या विशेष कॅप्सूलमध्ये सोने लपवून भारतात आणले जात होते. हे सोने मुंबई (Mumbai) विमानतळावर उतरल्यावर विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले जात होते.
तपासात एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या काही कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयने सापळा रचून ही कारवाई केली.
6 जून रोजी पहाटे डीआरआयने विशेष कारवाई करत अजित आचरेकरसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 3.2 किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजारमूल्य 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, परदेशी कॅरीअर्स विमानतळावर उतरल्यावर हे सोने संबंधित कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करत होते. त्यानंतर ते विमानतळाबाहेर काढून भारतीय साथीदारांकडे पोहोचवले जात होते. या साखळीमधील महत्त्वाचा दुवा म्हणून आचरेकर यांच्याकडे पाहिले जात आहे.
भाजपच्या कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्याचे नाव थेट सोने तस्करीप्रकरणात समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या आणि संघटनात्मक जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीचे नाव या प्रकरणात आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
दरम्यान, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी वेगळाच दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेने आंदोलन छेडले होते. त्याच पार्श्वभूमीवर अजित आचरेकर यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे.
मात्र डीआरआयने या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू केला असून हे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.