Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

नॉट रिचेबल सोमय्या अखेर अवतरले अन् गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत म्हणाले...

सोमवारी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी प्रकरणाबाबत व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नॉट रिचेबल असलेले भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) मंगळवारी अवतरले. सोमवारी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट करत आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी प्रकरणाबाबत (INS Vikrant Scam) व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. उच्च न्यायालयात याबाबत संपूर्ण माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तसेच निधी संकलनाबाबत खुलासा केला आहे.

आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहार प्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण त्यांनी पोलिसांकडे न जाता सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने सोमवारी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मंगळवारी सोमय्या यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Kirit Somaiya News Updates)

सोमय्या यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, 2013 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने विक्रांत युध्दनौकेला साठ कोटीत भंगारवाल्याला विकण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचा निषेध केला. भाजपने 10 डिसेंबरला चर्चगेट स्टेशनवर सांकेतिक, प्रतिकात्मक निधी संकलनाचा कार्यक्रम केला. सुमारे 11 हजार रुपये जमले. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे खासदार व मी स्वत: 17 डिसेंबर 2013 रोजी राष्ट्रपतींना सगळी माहिती दिली. राज्यपालांना सगळं सांगितलं.

आज संजय राऊत (Sanjay Raut) सांगतात, किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये ढापले. चार बिल्डरमार्फत मनी लाँर्डिंगच्या माध्यमातून नील सोमय्याच्या कंपनीत जमा केले. एक कागद नाही, एक पुरावा नाही, पोलिसांकडे पुरावा नाही. तक्रारदार म्हणतात, संजय राऊतांच्या स्टेटमेंटमुळे मी आलो आहे. संजय राऊतांनी आधीही असे सात आरोप केले आहेत. या घोटाळेबाज सरकारमधील सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात जात आहोत. न्यायालयासमोर ही सगळी माहिती ठेवणार आहे, असं सोमय्या यांनी व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं आहे.

झेड सिक्युरिटी असलेले सोमय्या कुठयेत?

राज्याच्या गृह विभागालाही सोमय्या नेमके कुठे आहेत, याची माहिती नाही. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आता मोठं पाऊल उचलणार आहे. मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांना सोमय्यांबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, झेड सुरक्षा असलेले किरीट सोमय्या कुठे आहेत, हे आता केंद्र सरकारलाच विचारू, असं वळसे पाटील म्हणाले आहेत. सोमय्या यांना केंद्र सरकारने मागील वर्षी झेड सिक्युरिटी दिली आहे. त्यामुळे सोमय्या हे सतत सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असतात. त्यामुळे सोमय्यांचा नेमका पत्ता विचारून वळसे पाटील केंद्रालाच अडचणीत टाकणार आहेत.

सोमय्या का आलेत अडचणीत?

माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फसवणूक आणि विश्वासघात कलमांन्वये तुर्भे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी निर्णय सुनावणार आहे. तर किरीट सोमय्या उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT