Cm Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Bjp vs Shinde Group : "PM मोदींच्या बदनामीचा आरोप ; भाजप नेत्याकडून थेट मुख्यमंत्री शिंदेंच टार्गेट!

संदीप पंडित

Vasai Virar News : वसई विरार महापालिका क्षेत्रात सद्या सूर्या पाणी पुरवठा योजनेवरून वाद पेटला आहे. सूर्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते शिंदे गटाकडून परस्पर जाहीर करण्यात आल्याने आता भाजपने दंड थोपटले आहे. पंतप्रधानांची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा भाजप उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी या प्रकरणी दिला आहे. पाणी योजनेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येण्याचे संकेत शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन केले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गट विरोधात भाजप असा सामना वसई-विरारमध्ये दिसेल, असे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.

मोदी सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सुमारे 1325 कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या सूर्या प्रकल्पातून वसई विरार महापालिकेला 185 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी सुमारे 85 एमएलडी पाणी नागरिकांना कधीही उपलब्ध होऊ शकते. हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहीत आहे. मात्र, नागरिकांची दिशाभूल करून पाण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेत बसलेल्या प्रशासकाला जबाबदार धरून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही राजकीय पक्षांना पाण्याचे श्रेय मिळण्याची शक्यता दिसत नाहीये. यामुळे त्यांनी गलिच्छ राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप भाजप उपाध्यक्ष मनोज बारोट केला आहे.

सूर्या प्रकल्पाचे ८५ एमएलडी पाणी जून महिन्यापासून सोडण्यास तयार आहे. पण उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यानंतर पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. अशाप्रकारे पाण्यावरून घाणेरडे राजकारण होत आहे. पाण्यासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरून त्यांना गोत्यात उभे केले. तसेच नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरार दौऱ्यावर आले असता त्यांनाही काळे झेंडे दाखवण्यात आले. पाण्यावरून होत असलेल्या गलिच्छ राजकारणाबाबत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे बोटे दाखवली जात असतानाही महापालिका प्रशासन मौन बाळगून आहे. महापालिका प्रशासनाच्या या मौनामुळे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला तडा जात आहे. याविरोधात आपण पंतप्रधान कार्यालयाकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघावर यापूर्वी भाजपने दावा केला आहे. तर सद्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्या शिंदे गटाकडून पुनः खासदारकीची इच्छुक असल्याने येणाऱ्या काळात भाजप विरोधात शिंदे गट असा सामना वसई विरारसह पालघर जिल्ह्यात बघायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT