Thane Political News : कल्याणमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांतील सुरू असलेले शीतयुद्ध विविध कारणाने उफाळून येते. काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील शाब्दीक चकमकी थांबल्याचे दिसत आहे. मात्र संधी मिळाली की हे नेते एकमेकांना चिमटे काढून डिवचण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोले लगावले आहेत. (Latest Political News)
कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणात आमदार गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील विकासकामांचा मुद्दा छेडला. येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी खासदारांनी लक्ष घालावे, अशी मागणी गायकवाडांनी केली. कल्याण पूर्वेतील विकासकामे रखडण्याला अप्रत्यक्षपणे खासदार शिंदेंना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. यामुळे कल्याणमधील उभय पक्षांतील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याचे काम लवकर व्हावे, यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पुढाकार घेत लक्ष घालण्याची विनंती केली. गायकवाड म्हणाले, 'राजकारणात माझ्याकडे कायम बोट दाखवले जात असले तरी सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. कारण मुख्यमंत्री तुमचे वडील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत, पण त्यांनी ते मनात आणलं पाहिजे,' असे म्हणत आमदार गायकवाडांनी खासदार शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्याण पूर्वेतील विकासकामांकडे लक्ष घालण्याची मागणीही केली.
कल्याण पूर्वेतील काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया म्हसोबा चौक ते तिसगाव नाका असा यू टाईप रस्ता होणार आहे. या रस्त्याचे ८० फुटाचे रुंदीकरणाच्या कामाला कल्याण डोंबिवली पालिकेने सुरुवात केलेली आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. कल्याण पूर्वेतील विकासकामांना पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप भाजपच्या वतीने कायम केला जातो. यातच यू टाईप रस्त्याच्या कामाची गती पाहता यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी लक्ष घालण्याची मागणी गायकवाडांनी जाहीरपणे केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'खासदार डॉ. शिंदे यांनी या रस्त्याच्या कामात जास्त लक्ष घातले पाहिजे. राजकारणाच्या दृष्टीने माझ्याकडे बोट दाखवले जात असले तरी जनता तुमच्याकडे बघते. सर्वांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत, कारण तुमचे वडील मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री शिंदे निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत. जलद निर्णय घेतात, पण त्यांनी मनात आणले पाहिजे. ज्या शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले असते त्याचा विकास होतो. या विकासासाठी लवकर तो यू टाईप रोड झाला पाहिजे,' अशी विनंतीवजा मागणी आमदार गायकवाडांनी खासदार शिंदेंकडे केली आहे. त्यामुळे खासदार शिंदे आता याकडे लक्ष घालणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.