Mumbai News : शिवसेनेत फूट पडून दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर करत त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतला. शिंदे यांच्या शिवसेनेला साथ देणाऱ्या याच गजानन किर्तीकर यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आयत्यावेळी आपला अर्ज मागे घेऊन आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता,असा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांचे चिरंजीव अमोल यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढविली आहे. मुलाला खासदार करण्यासाठी शिंदे गटात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदारकीची उमेदवारी घ्यायची.
अमोल कीर्तिकर विरूद्ध गजानन कीर्तिकर असे उमेदवार राहतील. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. त्यामुळे समोर दुसरा कोणीही उमेदवार नसणार. अशा पद्धतीने मुलगा अमोल याला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन किर्तीकर यांचा पूर्वनियोजित कट असल्याचा थेट आरोप महायुतीत मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या (BJP) दरेकर यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किर्तीकर यांच्या ज्येष्ठत्वाचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नेहमीच राखला. ते शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना पक्षात चांगली वागणूक दिली. पण गजानन किर्तीकर यांचा उद्देश संशयास्पद होता. हे आता हळूहळू बाहेर येत असल्याचा दावा देखील भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली असती तर आयत्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेत मुलाला बिनविरोध खासदार करण्यासाठी त्यांनी हा घाट घातल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे माजी खासदार किर्तिकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी किर्तीयाकर हे आपला मुलगा अमोल किर्तीकर यांच्याच गाडीत होते. निवडणुकीत त्यांनी आपले चिरंजीव अमोल याला मदत केली, असा आरोप शिवसेनेचे शिशिर शिंदे यांनी केला आहे. दरेकर यांनी केलेल्या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली असून दरेकर यांनी केलेल्या आरोपांवर किर्तीकर काय उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.