Mumbai News, 24 Dec : भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालानंतर पक्षाच्या धोरणांवर टीका करताना जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो, असं वक्तव्य केलं होतं.
मुनगंटीवार बोलले त्यात तथ्य देखील आहे, कारण मागील काही दिवसांपासून निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. यासाठी ते कोणालाही आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. मग तो कितीही मोठा गुन्हेगार असो वा भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता.
भाजप या सगळ्यांना पक्षात सामावून घेत आहे. अशातच आता ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे याला भाजपने पक्षात घेतलं आहे. यापूर्वी मयूर शिंदेने ठाण्यात भाजपप्रवेशासाठी मोठी बॅनरबाजी केली होती. मात्र, भाजप गुंडाला पक्षात घेत आहे, अशी टीका झाल्याने आणि शिंदे याच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे तो पक्षप्रवेश पुढे ढकलला होता.
शिवाय भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या आदेशामुळेच हा प्रवेश थांबवल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपने काल संध्याकाळी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश करून घेतला. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
तर मयूर शिंदे हा ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून लढण्याची तयारी करत असून त्याला भाजपमधून तिकीट मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. त्याला भांडूपमधून पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला.
त्याच्यावर हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 2023 साली धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे मयूर शिंदे चर्चेत आला होता. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. अशा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला भाजपने पक्षात घेतल्यामुळे विरोधकांना भाजपवर टीका करण्यासाठी आयती संधी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.