BJP Politics : 'भाजपचा 'शनी शिंगणापूर' सुधीरभाऊंच्या मनातील सल ही पक्षातील प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना...'

Shivsena UBT on BJP internal conflict : 'राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकणारा हा घोडा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र कमी पडला. संपूर्ण राज्यातील भाजप नेते गुलाल उधळून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करीत असतानाच भारतीय जनता पक्षाचेच विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मात्र दुःखी दिसत आहेत.'
Sudhir Mungantiwar, Devendra Fadnavis
Former Maharashtra minister Sudhir Mungantiwar reacts to BJP’s poor performance in Chandrapur municipal elections, triggering political debate across Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 24 Dec : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना भाजपचे नेते तथा माजी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली. शिवाय त्यांनी चंद्रपुरात पक्षाने माझी ताकद कमी केल्याचा आरोप केला.

तर 'जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो. या सगळ्या गोष्टींचे आम्ही जिल्ह्यात मूल्यांकन करू.' असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं असतानाच आता भाजमधील अंतर्गत वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर हल्लोबोल केला आहे.

सामनात लिहिलं की, 'राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठला मार्ग वापरतो, हे आता लपून राहिलेले नाही. निवडणुका जिंकण्याचे मंत्र, तंत्र आणि यंत्र भाजपच्या हाती असल्याने आपल्या विजयाचा घोडा भाजपवाले हवा तेथे उधळवतात.

तथापि, राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकणारा हा घोडा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मात्र कमी पडला. संपूर्ण राज्यातील भाजप नेते गुलाल उधळून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करीत असतानाच भारतीय जनता पक्षाचेच विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मात्र दुःखी दिसत आहेत. भाजप राज्यभर जिंकतो आणि फक्त चंद्रपुरातच कसा हरतो, असे कोडे सुधीरभाऊंना पडले असावे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. सात नगरपालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आणि एक जागा मिंध्यांनी जिंकली. जिल्हाभरात भाजपला जो सपाटून मार बसला, त्यामुळे सुधीरभाऊंमधील कार्यकर्ता दुखावला व त्यातूनच त्यांनी आपल्या मनातील खंत संयमी भाषेत बोलून दाखवला. ‘‘चंद्रपूर जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झाले.

तसे वातावरण निर्माण व्हावे असेच आमच्या पक्षाचे धोरण दिसते. त्यातूनच 11 नगरपालिकांमध्ये आम्ही गटबाजी अनुभवली,’’ अशी जाहीर खंत सुधीरभाऊंनी व्यक्त केली. ‘‘काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. मात्र आमच्या नेत्यांनी माझी शक्ती कमी केली,’’ अशी खंत मुनगंटीवार यांनी या निकालानंतर व्यक्त केली.

सुधीर मुनगंटीवार हे अनेक वर्षे राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मात्र अजित पवारांच्या रूपाने कदाचित त्यांच्यापेक्षाही ‘सक्षम’ व ‘प्रामाणिक’ अर्थमंत्री महाराष्ट्र भाजपच्या हाती लागल्यामुळे सुधीरभाऊंच्या मंत्रीपदाचा पत्ता कट झाला, असा टोलाही सामनातून अजित पवार आणि भाजपला लगावला.

Sudhir Mungantiwar, Devendra Fadnavis
Walmik Karad : 'मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही...'; दोष मुक्तीसाठी वाल्मीक कराडचा खंडपीठात अर्ज

तर मंत्रीपद न दिल्यानेच भाजपने माझी शक्ती कमी केली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली असावी. त्यातच भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘‘मंत्रीपद नाही म्हणून हरलो, असे नसते,’’ असे विधान करून त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. त्यावर ‘‘मध्यंतरी बावनकुळेंची शक्ती कमी करण्यात आली होती तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते,’’ असे प्रत्युत्तर सुधीरभाऊंनी दिले.

सुधीरभाऊंची पक्षात होणारी ही घुसमट केवळ आजची नाही. लोकसभेच्या निवडणुकीपासूनच ते अस्वस्थ आहेत. इच्छा नसतानाही त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास भाग पाडले गेले व तेव्हाही दोन लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला. यामागे पक्षातीलच काही लोक आहेत याचे शल्य त्यांच्या मनात असावे. सुधीरभाऊंच्या मनात बरीच खदखद साचलेली आहे व ती नगरपालिका निकालाच्या निमित्ताने थोडीशी का होईना, बाहेर पडली.

Sudhir Mungantiwar, Devendra Fadnavis
NCP Politics : 'खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ...' दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणामध्ये आडकाठी करणाऱ्या प्रशांत जगतापांना अजितदादांच्या आमदाराने सुनावलं

मुनगंटीवार म्हणतात, ‘‘भारतीय जनता पक्षाने जे सूत्र अवलंबले, ते ‘शनी शिंगणापूर’सारखे आहे. भाजप हा चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव असा पक्ष आहे, ज्याला दरवाजेच नाहीत. त्यामुळे कोणीही केव्हाही येतो आणि त्याला पक्षात सामावून घेतले जाते.’’ चंद्रपूर जिल्ह्यातील पराभव जिव्हारी लागल्याने एका कार्यकर्त्याच्या तोंडून बाहेर पडलेला हा संताप आहे.

शनी शिंगणापूर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे व या गावातील एकाही घराला दरवाजा नाही. भाजपचेही तसेच झाले आहे. पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना थेट शनी शिंगणापूरशी केली आहे. मात्र एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे ‘शनी शिंगणापूर’ झाले आहे काय? राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची दारे सर्वपक्षीय नेत्यांसाठी सताड उघडी आहेत. राज्यातच कशाला, संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाचा ‘शनी शिंगणापूर’ झाला आहे.

विरोधी पक्षांतील नेत्यांवर घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर सुगंधी तेलाचा अभिषेक करून त्यांना पवित्र करून घ्यायचे सत्र भाजपमध्ये गेली 11 वर्षे सुरू आहे. भाजपचा ‘शनी शिंगणापूर’ होणे ही सुधीरभाऊंच्या मनातील सल आहे व हीच भाजपच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना आहे. देवाभाऊंचे यावर काय म्हणणे आहे? असा सवाल सामनातून मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com