Ashish Shelar, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election: प्रेम 'यांच' आणि 'त्यांच' सेम नसतं...; कविता शेअर करत शेलारांनी ठाकरेंना डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

Ashish Shelar On Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात त्यांची लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका असणार हे जाहीर केलं. अनेक दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत जाणार का?, ते कोणती जागा लढवणार का? अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आपण केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका भाजपला सकारात्मक असल्याने आता यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपसह महायुतीतील मित्रपक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करत आहेत. तर आघाडीचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, मी एखाद्यावर प्रेम केलं तर टोकाचं प्रेम करतो आणि विरोधही टोकाचा करतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच पार्श्वभूमिवर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक तर उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं "यांच" आणि "त्यांच" सेम नसतं, अशा आशयाची एक कविता त्यांनी शेअर केली आहे.

शेलारांनी शेअर केलेली कविता

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, "यांच" आणि "त्यांच" सेम नसतं!

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?

असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, "यांच" बिनशर्त असतं आणि "त्यांच" मुख्यमंत्री पद मागतं !

त्यासाठी देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत! प्रेम.. "यांच" आणि "त्यांच" सेम नसतं !

कवितेच्या खाली त्यांनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून असंही लिहिलं आहे. आशिष शेलार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटावर टीका करत असतात. अशातच आता त्यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी आपली विचारधारा सोडल्याची टीका केली आहे. शिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या प्रेमात फरक असल्याचंही त्यांनी कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ते 'सेम' वेगळं आणि हे 'शेम' वेगळं

आशिष शेलारांच्या या कवितेवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. प्रेम हे प्रेमच असतं आणि ते सेमही असतं. परंतु यांचं सेम वेगळं आणि शेम हे वेगळं आहे. सध्या जे राज्यात सुरु आहे. ते शेम शेम आणि शेम असं व्याभिचारी असल्याचं म्हटलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT