Milind Deora, Baba Siddiqui, Jagdish Anna Kutti Sarkarnama
मुंबई

BJP Politics : मुंबईत भाजपची बेरीज, काँग्रेसची पुन्हा वजाबाकी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai BMC Politics :

मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचे नगरसेवक, आमदार आणि नेत्यांच्या 'मनपरिवर्तना'चे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून आता आणखी एका माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांत दोन नेत्यांनी काँग्रेस सोडून महायुतीतील पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा असून, भविष्यात बरेच काही घडण्याची शक्यता सांगितली जाते.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोन मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडल्याने मुंबईतील काँग्रेसची अवस्था बिकट असल्याचे बोलले जाते.

जगदीश अण्णा कुट्टी (Jagdish Anna Kutti) हे काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील (BMC) माजी नगरसेवक आहेत. तसेच ते काँग्रेसचे मुंबई जिल्हाध्यक्षदेखील आहेत. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष तसेच आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस हादरली आहे. या वेळी आणखी काही नेत्यांचेही भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जगदीश अण्णा कुट्टी यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा वेगळा कार्यक्रम होईल, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. कुट्टी यांच्यासारखा चांगला कार्यकर्ता भाजपमध्ये आल्याचा भाजप फायदा करून घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच लवकर त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल, असेही सांगितले.

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत. आतापर्यंत दोन नेत्यांनी काँग्रेस सोडली असून, आणखी नेत्यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यास मुंबईत काँग्रेस खिळखिळी होईल आणि महाविकास आघाडीची ताकद घटेल. निवडणुकीपूर्वीच्या या घडामोडी मविआसाठी नक्कीच त्रासदायक ठरणार आहेत.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक दाम्पत्याने शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. माजी सुरेश आवळे 2012 मध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. आणि त्यांच्या पत्नी रूपाली आवळे 2017 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना त्यांचे बळ वाढवण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न करत आहेत. लोकसभेसाठी भाजपसह महायुतीने 'मिशन 45'चे लक्ष्य ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT