राहुल क्षीरसागर
Thane News : आगामी महापलिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष सुरु असून दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. अशातच दोन दिवसापूर्वी भाजपच्या ठाण्यातील विभागीय कार्यालयातील बैठकीनंतर महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले असताना, दुसरीकडे ठाण्यातील विविध भागात भाजपकडून बॅनर लावत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले जात आहे.
कॅडबरी सिग्नल येथे भाजपचे अल्केश कदम यांनी लावलेल्या बॅनरची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. या बॅनरवर 'ठाण्याचा विकास, चप्पा चप्पा, दिसे सर्वत्र फक्त आणि फक्त भाजपा भाजपा भाजपा' असा मजकूर होता. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून बॅनर लावत शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा डिवचले असल्याचे बोलले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व नेत्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार निवडणुकीची पुढील दिशा ठरविण्यात येत आहे. अशातच महायुतीतील मित्र पक्षांमध्येच चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.
ठाणे भाजपकडून काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मार्गदर्शन शिबीरात पक्षाने आगामी निवडणुकीसाठीची ताकद दाखवली. यात उमेदवारांना संघटन, प्रचारतंत्र आणि मतदारांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या माध्यमातून ठाणे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याची चर्चा असतानाच, कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा देत ‘अब की बार ७० पार’ ची घोषणा दिली होती. तर, दुसरीकडे आनंद आश्रम येथे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आणि आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमधील भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.