Mumbai News : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे तिन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याने टोकाचे आक्रमक आहेत.
महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील हा वाद एवढा वाढला आहे की, त्याचे धक्के आता भाजपला बसू लागले आहेत. त्यामुळे यावर भाजपने दोन्ही पक्षाला कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपचे प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला, पालकमंत्रीपदासाठी भांडत राहिल्यास, ते जनतेला आवडणार नाही, असे सुनावले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील वाद जुनाच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून या वादाला सुरवात झाली होती. आजवर ज्यांच्या विरोधात कायम शिवसेनेने लढा दिला, अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी जुळवून घेण्याची वेळ पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आली. परंतु स्थानिक पातळीवर हा निर्णय पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडला नाही.
2019मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली अन् पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पालकमंत्रीपदही दिले. त्याचवेळी तीन वेळा निवडून येऊनही भरत गोगावले यांना मंत्रीपदात समावून घेतले नाही. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेकडे पालकमंत्रीपद घ्या, अशी विनंती केली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महायुतीबरोबर सत्ता स्थापन केली. त्यावेळी उदय सामंत यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी वर्णी लागली. यात पुन्हा भरत गोगावले यांना नाराज झाले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, महायुतीत राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. लोकसभेत सुनील तटकरे यांना शिवसेनेने मदत केली. परंतु विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं बंडखोरी केली.
आता रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. यात आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदावर वर्णी लागली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिक नाराज आहे. ही नाराजी एवढी उफाळली आहे की, भरत गोगावले यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून जशास-तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.
तटकरे-गोगावले यांच्यातील वाद वाढत असतानाच, महायुतीमधील भाजपने दोन्ही पक्षाला फटकारले आहे. प्रवीण दरेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला कानपिचक्या दिल्या आहेत. रस्त्यावर उतरून वादविवाद करणे शोभनीय नाही. पालकमंत्री पद म्हणजे, जीवन मरणाचा प्रश्न नाही. जनतेने राज्याच्या विकासासाठी महायुतीला जनाधार दिला आहे. आपलं म्हणणं, पक्ष किंवा महायुतीच्या चौकटीत हा प्रश्न सोडवता येईल. त्यासाठी हमरीतुमरीवर येवून रस्त्यावर उतरणं उचित नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.