Thane Bhiwandi Sarkarnama
मुंबई

भिवंडीत सत्तास्थापनेसाठी भाजपने सुरु केली तयारी; काँग्रेसला मदत करणारा समाजवादी पक्षच नॉट रिचेबल

भिवंडीमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून काँग्रेसला मदत करणारा समाजवादी पक्ष अद्याप संपर्कात नाही. वाचा सविस्तर राजकीय अपडेट.

Rashmi Mane

भिवंडी महापालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून शहरातील राजकारण सध्या चांगलेच तापले होते. महापौरपदाच्या निवडीपूर्वी भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, या घडामोडींमुळे सर्वच पक्षांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. भाजपकडून महापौरपदासाठी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी नारायण चौधरी यांचे नाव जाहीर केल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारायण चौधरी यांच्या नावाची माहिती पत्राद्वारे दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शहराध्यक्षांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर नारायण चौधरी यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मीडियावर झळकू लागले. मात्र, याच वेळी भाजपमधील अंतर्गत मतभेदही उघडकीस आले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांच्या समर्थकांनी, सुमित पाटील यांचीच महापौरपदासाठी अधिकृत निवड झाल्याचा दावा करत बॅनर व्हायरल केले. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट चित्र समोर आले.

भिवंडी महापालिकेत भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी काही नगरसेवक सुमित पाटील यांच्या बाजूने तर काही नारायण चौधरी यांच्या पाठिशी उभे असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटांतील नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी गेले असल्याने राजकीय घडामोडींना अधिकच रहस्याची किनार मिळाली आहे. दरम्यान, नारायण चौधरी यांच्या नावाचे जे पत्र शहराध्यक्षांना मिळाले आहे, त्यावर जावक क्रमांक नसल्याने सुमित पाटील यांनी त्याबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दाद मागणार असल्याचे सुमित पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, नारायण चौधरी यांनी मात्र पक्षाकडून आपलीच अधिकृत नियुक्ती झाल्याचा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेले लेखी पत्र आपल्याकडे असल्याचे सांगत, महापौरपदासाठी आपलेच नाव अंतिम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील हा वाद नेमका कुठे थांबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समाजवादी पक्षातील अंतर्गत नाराजीही या घडामोडींमागे कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आमदार रईस शेख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिल्यामुळे पक्षातील अनेक उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोप होत आहे. याच नाराजीतून सहा नगरसेवक ऐनवेळी गायब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भिवंडीतील सत्तास्थापना आता कोणाच्या बाजूने झुकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT