

Yavatmal News: राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी (ता.7 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. याचदरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या महागाव नगर पंचायतीचे उपाध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांचं त्यांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं महागाव जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
महागाव नगर पंचायतीचे उपाध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद भरवाडे यांनी पुसद येथील एका संस्थेच्या आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. हीच दाखल तक्रार मागे घेण्यासाठी हे अपहरणाचा कट रचला गेल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद भरवाडे यांच्यावर अनेकप्रकारे दबाव टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या दबावाला झुगारल्यामुळेच अज्ञात आरोपींनी प्रमोद भरवाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचंही बंदुकीच्या धाकानं अपहरण केलं.
अपहरणकर्त्यांनी महागाव पंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे आणि त्यांच्या कुटुंबाला गाडीत बसवून थेट नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या हद्दीत नेलं. तिथं त्यांच्या डोक्यावर पिस्तूल लावून, तक्रार मागे घेण्यासंदर्भात किंवा अन्य काही कोऱ्या कागदपत्रांवर जबरदस्तीनं स्वाक्षरी घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे महागाव येथे काहीवेळ तणावाचं वातावरण झालं होतं. तसेच या धक्कादायक घटनेमुळे भरवाडे कुटुंबातही भीतीचं वातावरण आहे.
अपहरणकर्त्यांनी तक्रार मागे घेण्यासंदर्भात वा अन्य काही कोऱ्या कागदपत्रांवर जबरदस्तीनं स्वाक्षरी घेत आपला हेतू साध्य झाल्यावर भरवाडे कुटुंबाला हिंगोली-वाशीम रोडवरील एका निर्जनस्थळी सोडून दिलं. यानंतर अज्ञातांनी तिथून पळ काढला.
या प्रकरणी प्रमोद भरवाडे यांनी पोलिस तक्रार दाखल केली नसल्याची माहितीही समोर येत आहे. अपहरणाच्या घटनेचा मोठा धक्का बसल्यामुळे भरवाडे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.