Palghar Lok Sabha Constituency : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होऊन, प्रचारही सुरू झाला आहे. तर महायुतीमध्ये मात्र शिवसेना आणि भाजपात उमेदवार व मतदारसंघावरून ओढाताण सुरू आहे. तसेच, या मतदारसंघात निलेश सांबेर यांच्या जिजाऊ संघटनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने अद्यापपर्यंत वेट अॅण्ड वॉच ही भूमिका घेतली आहे, मात्र ते उमेदवार जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. एकूणच पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने पालघरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. पालघर मतदारसंघावर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते. 2009 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु त्यानंतर झालेल्या पुढच्या निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघावर परत आपले वर्चस्व मिळविले. आता मतदारसंघात विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत, जे की मूळ भाजपमधून शिवसेनेत गेले होते.
मात्र शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला आता भाजपकडून विरोध होत आहे. तर शिवसेनेकडून तेच संभाव्य उमेदवार म्हटले जात असून, त्यांनी त्या दृष्टीने प्रचारही सुरू केला आहे. महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला नसल्याने, भाजप आणि शिवसेनेत उमेदवारावरून घासाघीस सुरू असल्याचे दिसत आहे.त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यात, महायुती आणि महाविकास आघाडीने मतदारसंघामधील उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली. मात्र, महिनाभराचा कालावधी होत आला तरी आघाडी आणि युतीचे सर्व जागा वाटप आणि उमेदवार निश्चित झालेले नाहीत. अनेक ठिकाणी वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही.
पालघरची जागा महायुतीमध्ये याच तिढ्यात अडकली आहे. शिवसेनेकडून ही जागा आपलीच असुन उमेदवार म्हणून राजेंद्र गावीत यांना वारंवार घोषीत केले जात आहे. तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ही जागा अनेक वर्षांपासून युतीधर्मात पारंपारिक पद्धतीने भाजपचीच असल्याचा दावा केला जातो आहे. या परस्पर विरोधी दाव्याने महायुतीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम ही जागा शिवसेनेची असुन येथे राजेंद्र गावीत हे उमेदवार असल्याचे घोषित केले. त्यादृष्टीने राजेंद्र गावीत यांनी जिल्ह्यात प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर लगेचच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी ही जागा भाजपची असुन राजेंद्र गावीतांच्या उमेदवारीला उघड विरोध करत माध्यमांकडे आपली बाजू मांडली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली.
या दोन्ही पक्षांमधील हा वाद महिनाभरापासून खदखदत आहे. त्यावेळी भाजप नेते आणि पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मनोर येथे मेळावा घेऊन "नरेंद्र मोदी हेच उमेदवार" समजून सर्वांनी कामाला लागा असे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पालघरच्या जागेचा आग्रह कायम राहीला आहे. दरम्यानच्या काळात राजेंद्र गावीत यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्यामुळे गावीत भाजपकडून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे.
राजेंद्र गावीत यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या वावड्या उठल्याने, भाजपच्या जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांची भेट घेत, राजेंद्र गावीत यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नाही. तळागाळातील खरा मतदारांमध्ये गावीत यांच्या विषयी नाराजी आहे.
तसेच त्यांनी जनाधार गमावला असल्याचा पाढा वाचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यांला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास सामुहिक राजेनामे देण्याची तयारी केली आहे. तसेच ही वास्तवस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर युवासेनेचा कार्यकर्तां मेळावा पालघरमध्ये झाला आहे. या मेळाव्यात युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राजेंद्र गावीत हेच पालघर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचे उमेदवार असल्याचे जाहीर करून भाजप पदाधिकाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. त्यामुळे भाजप- शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढला असुन वातावरण अधिकच तापले आहे.
(Edited by - Myur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.