Vinod Tawade, Ashish Shelar
Vinod Tawade, Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

Karnataka Election : भाजपच्या तावडे-शेलारांकडे आयटी हब असलेल्या बंगळुरूची जबाबदारी; 'हे' आहे कारण

मृणालिनी नानीवडेकर

Karnataka Election and BJP : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी सुरू झाली आहे. ही निवडणूक भाजपसाठी कसोटीची ठरणार असल्याचे दिसून येत आहे. तर काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात पुन्हा कमबॅक करण्याची संधी देणारी ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रत्येक जागेसाठी मोठी ताकद लावल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी दोन्ही भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातूनही मोठी फौज निघाली आहे. यात विनोद तावडे, आशिष शेलार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि मुंबई महानगराचे पक्षप्रमुख आशिष शेलार यांच्याकडे भाजपने बंगळुरू शहराची जबाबदारी दिली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू हे शहर भाजपसाठी महत्वाचे आहे. बंगळुरू महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारखेच महानगर आहे.

या शहर व परिसरात 'आयटी कंपन्यां'चे जाळे पसरले आहे. तावडे आणि शेलार यांना आधुनिक जगात रमणाऱ्या 'नेटीझन्स'ची नस माहिती आहे. त्यांची मते भाजपला कशी मिळतील यासाठी तावडे आणि शेलार यांच्याकडे बंगळुरू शहरासह परिसरातील २० विधानसभेच्या जागांकडे लक्ष देण्याची जबाबदारी दिल्याचे समजते.

भाजपसाठी (BJP) सत्ता राखणे अवघड असल्याने भाजपला मत देवू शकणाऱ्या या महानगरातील प्रत्येक जागा महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे बंगळुरूसह परिसरातील २० जागावरील उमेदवारांसाठी प्रचार मोहिम कशी आखायला हवी, मतदानाच्या टक्केवारीत वाढ कशी होईल याचे नियोजन तावडे आणि शेलार कर्नाटकमधील भाजपच्या चमुसमवेत करीत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचे निधन झाले आहे. मृत्यूनंतर सर्व विधी आटोपून तावडे बंगळुरूला कडे रवाना झालेले आहेत. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. मात्र भाजपसाठी कर्नाटकमधील लढाईही महत्वाची आहे. त्यासाठी शेलार आधीच बंगळुरूला पोहचले आहेत. तेथे ते निवडूक होईपर्यंत थांबणार आहेत. तेथील व्यापातून वेळ काढून शेलार मुंबईच्या नियोजनासाठी वेळ काढतील, असे भाजपमधून सांगण्यात येत आहे.

भाजपच्या तावडे आणि शेलार यांच्यासारख्या दिग्गजांनी कर्नाटकमध्ये (Karnataka) तळ ठाकला आहे. या नेत्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेतेही कर्नाटकमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईच्या माटुंगा परिसरातील राजेश क्षीरसागर यांचाही देशातून निवडलेल्या ५० महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्याकडे भाजपने ग्रामीण कर्नाटकची जबाबदारी दिली आहे.

काँग्रेससाठी कर्नाटक निवडणुक सोपी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या राज्यात सत्ता स्थापन करता आली तर काँग्रेसला (Congress) राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन करण्यासाठी फायदा होणार आहे. त्यासाठी पक्षाने नियोजनावर भर दिल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अनेक काँग्रेसनेते कर्नाटकात पोहोचले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT