BMC Election: राज्यात सध्या २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे. पण हे सुरु असताना अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. त्यातच मुंबईत मोठ्या प्रमाणावर दुबार, बोगस मतदान, ईव्हीएममध्ये बिघाड अशा अनेक तक्रारी येत आहेत. त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. यामध्ये मतदान केंद्रावरच निवडणूक अधिकारी मतदारांचं नाव यादीत शोधण्यासाठी भाजपच्या अॅपचा वापर करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कांदिवलीतील मतदान केंद्रांवर हा गंभीर प्रकार दिसून आला आहे. इथल्या एका मतदान केंद्रावर नेमलेले निवडणूक अधिकारी मतदारांची नाव शोधण्यासाठी भाजपच्या अॅपचा वापर करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व तटस्थ असणं अपेक्षित असताना, प्रत्यक्ष मतदानावेळीच एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या अॅपचा वापर होत असल्यानं निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यांनीच आपल्या ट्विटर हँडरवरुन निवडणूक अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ शअर केला आहे.
या घटनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, या प्रकरणाची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. निष्पक्ष निवडणुकीत पक्षीय अॅपचा वापर म्हणजे थेट आचारसंहिता उल्लंघन असल्याचं चित्रे यांनी म्हणताना या प्रकारावर आता निवडणूक आयोगानं कारवाई करावी. राज्य निवडणूक आयोग आता कारवाई करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मतदान केंद्रावर मतदारांना मतदानासाठी ईव्हीएमपर्यंत पाठवताना यादीत नाव चेक करुन, त्यावर टीक करुन मग पुढे बोटावर शाई लावून पुढे पाठवलं जातं. त्यानंतर ईव्हीएम मशिनसमोर उभा राहुन मतदार आपण निवडलेल्या उमेदवाराला मतदान करतो. याच प्रक्रियेत यादीत नाव तपासण्यासाठी बेंचवर बसलेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्यानं चक्क आपल्या मोबाईलमधील BJP Wings नावाचं अॅप उघडून त्यात मतदारांची नावं शोधून दिली. हा प्रकार सुरु असतानाच एका मतदारानं त्यावर आक्षेप घेत व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला भाजपचं मोबाईल अॅप वापरण्याची परवानगीच कशी मिळाली? असा सवालही त्यानं केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.