Mahapalika Election : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये ठाकरे ब्रॅंडचा धुव्वा उडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागील २५ वर्षांपासूनच्या सत्तेला हादरा बसणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेच्या युतीकडून ठाकरे बंधूंची सत्ता उखडून टाकली जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतांसाठी मराठी मतांचा आकडाही महत्वाचा फॅक्टर ठरला आहे.
मुंबई महापालिकेची २२७ जागांसाठी निवडणूक झाली. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप ८४ जागांसह मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. एकनाथ शिंदेंची शिवसेना ३५ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस २३ जागांसह चौथ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज आहे.
राज ठाकरेंच्या मनसेला केवळ १० जागा मिळतील, असा अंदाज आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि वंचितला केवळ दोन जागा मिळतील. महायुती ११९ जागा मिळवत मुंबईची सत्ता काबीज करेल. ठाकरे बंधूंना केवळ ७५ जागांपर्यंत मजल मारता येईल, असा साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
Axis My India च्या एक्झिट पोलनेही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने कल दिला आहे. या युतीला तब्बल १३१ ते १५१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाकरेंना केवळ ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागू शकते.
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनेही भाजप युतीला १३८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. महायुतीला मिळणारी मतांची टक्केवारी ४२ ते ४५ आणि ठाकरेंना मिळणारी मते ३४ ते ३७ टक्क्यांच्या जवळपास असतील, असा अंदाज आहे. काँग्रेस आणि वंचितला १३ ते १५ टक्के मते मिळतील, असा अंदाज जेव्हीसीने वर्तविला आहे.
सर्वात महत्वाचा फॅक्टर -
Axis My India च्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंच्या बाजूने ४९ टक्के मराठी मतदार उभे राहिल्याचे दिसते. तर भाजप युतीकडेही ३० टक्के मराठी मतदार झुकल्याचा अंदाज पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. उत्तर भारतीयांनी एकहाती महायुतीला साथ दिल्याचे दिसते. तब्बल ६८ टक्के उत्तर भारतीयांनी भापला साथ दिली आहे. तर केवळ १९ टक्के मतदार ठाकरेंच्या बाजूने उभे राहिल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
दक्षिण भारतीय मतदारांनीही भाजपलाच पसंती दिली आहे. तब्बल ६१ टक्के मतदारांनी भाजपला तर २१ टक्के मतदारांनी ठाकरेंना साथ दिल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुस्लिम समाज काँग्रेसच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसते. मुस्लिमांची ४१ टक्के मते काँग्रेसला तर २८ टक्के ठाकरेंना आणि १२ टक्के भाजपला मिळू शकतात, असा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.