Bhagatsingh Koshyari, CM Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

राज्यपाल-ठाकरे सरकार वादावर न्यायालयाच्या कानपिचक्या: महाजनांची याचिकाही फेटाळली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government) यांच्यामधील संबंध कायमच तणावाचे राहिले आहेत. याच संबंधांवर राज्यातील सध्याचे राजकीय चित्र दुर्देवी आहे असे कठोर निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फटकारले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला भाजपचे (BJP) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायलयाने हे निरीक्षण नोंदवले.

उच्च न्यायालयाने यावेळी बोलताना राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधांवर बोट ठेवले. न्यायालय म्हणाले, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील संबध शीतयुद्धासारखे आहेत आणि सध्याचे राज्यातील हे राजकीय चित्र दुर्देवी आहे. महाराष्ट्रात वैधानिक पदांवरील दोन्ही व्यक्तींचा परस्परांवर विश्वास नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून आपल्यातील मतभेद, वाद मिटवायला हवेत. कारण याचा परिणाम राज्याच्या कारभारावर होत आहे. यामुळे राज्याचा कारभार सकारात्मकरित्या पुढे जाताना दिसत नाही.

न्यायालयाने निकाल देताना गिरीश महाजन यांना दणका दिला आहे. गिरीश महाजन यांच्या याचिकेत वैधता दिसत नाही, असे म्हणतं न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. सोबतचं महाजन यांनी दाखल केलेले १० लाख रुपये डिपॉझिटही न्यायालयाने जप्त केले आहे. याचिकेच्या सुनावणीपूर्वी उच्च न्यायालयाने महाजन यांना १० लाख रुपये तर इतर याचिकाकर्त्यांना २ लाख रुपये जमा करण्याची पूर्वअट ठेवली होती. त्यानुसार महाजन यांनी काल ही रक्कम जमा केली होती. मात्र आता ही रक्कम जप्त झाली आहे.

१२ आमदारांच्या निर्णन न घेतल्यामुळेही न्यायालयाची नाराजी

न्यायालयाने यावेळी १२ आमदारांची नियुक्ती न केल्याबद्दल नाव न घेता राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली. न्यायालय म्हणाले, आम्ही आठ महिन्यांपूर्वी १२ विधानपरिषद नामनिर्देशित सदस्यांबाबत निर्णय दिला होता. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा सवाल मुख्य न्या. दिपांकर दत्ता यांनी याचिकाकर्ते महाजन यांना केला. राज्यपालांनी न्यायालयाच्या मताचा मान राखायला हवा होता, अशी खंतही न्यायालयाने बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT