BRS And Pankaja Munde : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपला पक्ष भारत राष्ट्र समितीला देशभरात नेण्याचे ठरविले आहे. त्याची सुरूवात महाराष्ट्रातून झालेली आहे. राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह बड्या नेत्यांनी 'बीआरएस' पक्षात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'बीआरएस'ने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठी ऑफर दिली आहे.
महाराष्ट्रात 'बीआरएस'ची नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या सभा पार पडल्या. यावेळी (केसीआर) यांनी 'अब की बार किसान सरकार' अशी घोषणा दिली आहे. पुणे येथे 'बीआरएस'चे मोठे कार्यालय होणार असल्याची घोषणाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे राज्यात केसीआर यांचा झंजावात वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केसीआर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज्याची जबाबदारी घेण्याची विनंती केली होती. शेट्टी यांनी मात्र ती ऑफर नाकारली.
काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगिरथ भालके यांच्यासाठी केसीआर यांनी खास विमान पाठवून हैद्राबादला बोलावून घेतले होते. या भेटीची राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता केसीआर आषाढी एकादशीनिमित्त २७ जून रोजी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर 'बीआरएस'चे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना 'ऑफर' दिली. 'बीआरएस'मध्ये पंकजा मुंडे आल्यास मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. गोपीनाथ गडावर त्यांनी पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भेटणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सानप म्हणाले की, "स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप संपूर्ण देशभरामध्ये रुजवण्याचे काम केले. त्यांच्याच कन्येवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. याबाबत केसीआर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला, तर केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करतील."
'बीआरएस'च्या या ऑफरवर पंकजा मुंडे यांच्याकडून अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.