Nrew Delhi, 01 February : ज्येष्ठ नेते शरद पवार हे एनडीएसोबत यायला तयार नाहीत, त्यामुळे पवारसाहेबांनी भूमिका बदलली तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. पवार यांनी अजूनही विचार करण्याची गरज आहे, असे विधान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर माध्यमांशी बोलत असताना केंद्रीय मंत्री आठवले यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतानाच होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र आल्या होत्या.
अजितदादा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोघे एकत्र येतील, अशी चर्चा त्यावेळीही होती. पण अडचण अशी आहे की, शरद पवार हे भाजप, एनडीएसोबत यायला तयार नाहीत. जर पवारसाहेबांनी भूमिका बदलली तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयावर ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचे मोठे दुःख आमच्यासमोर आहे. अजितदादांसारखा ॲक्टिव्ह नेता आज आमच्यात राहिला नाही. विमान अपघतात नेता जाण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.
सुनेत्रा पवार यांना माहेरपासून सासरपर्यंत मोठा राजकीय वारसा आहे. त्या अजित पवार यांच्या पत्नी होत, शिवाय माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीणही आहेत. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्या अत्यंत चांगलं काम करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
अजितदादा पवार यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी दुःख विसरून त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा हाती घेतली आहे, असेही आठवलेंनी स्पष्ट केले.
आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाला संपूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्रात अजितदादा पवार यांची आठवण ठेवून त्या सातत्याने ॲक्टिव्ह राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.