

BMC Election News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी झाली. जागावाटपाची घासाघीस अगदी शेवटपर्यंत सुरू होती. मोठ्या राजकीय पक्षांच्या या साठमारीत छोट्या-मोठ्या पक्षांची उपेक्षा झाल्याचे चित्र आहे. शेवटच्या क्षणी दगाफटका झाल्यामुळे मुंबईत महायुतीचा भाग असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) तसेच डावे पक्ष, इतर रिपब्लिकन गटांना आता स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत.
रामदास आठवले यांच्या पक्षाला भाजपने डावलल्याचे चित्र आहे. पक्षाने या वेळी भाजपकडे 25 जागांची मागणी केली होती. त्यातील 16 जागा आम्हाला सोडा. आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील, असेही आठवले यांनी सांगितले. पक्षाच्या नेत्यांना भाजपच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावून त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. शेवटी ‘रिपाइं’ने 38 जागांसाठी उमेदवारी यादी जाहीर केले.
दुसरीकडे मुंबईत वंचित बहुजन आघाडीसह दोन्ही डाव्या पक्षांना बरोबर घेण्याचे काँग्रेसने ठरवले होते. मात्र ‘वंचित’ला 62 जागा सोडणाऱ्या काँग्रेसने डाव्या पक्षांना फारसे विचारात घेतले नसल्याचे कळते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी 20 ते 30 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी काँग्रेसने सहा जागा सोडल्या होत्या; मात्र त्यातील काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते. युती धोक्यात येताच काँग्रेस नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ही युती वाचल्याचे समजते.
जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती आहे. कवाडे गटाने मुंबईत शिवसेनेकडे दहा ते 15 जागांची मागणी केली होती; मात्र मुंबईत पक्षाच्या वाट्याला 90 जागा आल्यामुळे शिवसेनेने एकही जागा सोडली नाही. परिणामी कवाडे यांच्या पक्षाचे उमेदवार 15 जागांवर लढत आहेत. त्यातच मोठा गाजावाजा करीत एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केली आहे; मात्र शिवसेनेने रिपब्लिकन सेनेला एकही जागा सोडली नसल्याचे समजते.
यावर बोलताना भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, आठवले यांना पाच ते सहा जागा देण्यास महायुती तयार होती; मात्र त्यातही आठवले यांना विशिष्ट जागाच हव्या असल्यामुळे त्याबाबत एकमत होऊ शकले नाही. आता आठवले आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर अंतिम तोडगा निघेल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर डाव्या पक्षांनी मागितलेल्या बहुतांश जागा या वंचित आघाडीकडे गेल्या. त्यामुळे त्या जागा आम्हाला ‘डाव्यां’साठी सोडता आल्या नाहीत, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सांगितले.
‘व्होट चोरी’च्या आंदोलनानंतर काँग्रेस आमच्या संपर्कात नाही. वाटाघाटी करताना आम्हाला विचारात घेतले नसल्याने मार्क्सवादी पक्षाने मुंबईत 20 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत, असे माकपचे राज्य सचिव अजित नवले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.