Sharad Pawar News : देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत. ज्या राज्यात सरकारे आहेत, ती आमदार फोडून आणलेली आहेत, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले होते. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ''शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही. ते पवारसाहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करीत आहेत,'' अशा शब्दांत टोला लगावला.
शरद पवार (Sharad Pawar) सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर बावनकुळे म्हणाले, ''पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात,''
''मोदीजी पुन्हा येणार नाहीत असे भाकीत तुम्ही केले पण तुमचे हे भाकीत खरे होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम कुणी केले हे महाराष्ट्रातील जनतेने तुमचे सरकार असताना पाहिलेय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा,'' असा सल्लाही बावनकुळे यांनी पवारांना दिला.
''बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही 'घमंडीया' ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला (BJP) साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे,'' असे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, पवारांनी भाजपवर टीका करताना आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, ती भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी व राज्यकर्ते यांची भूमिका देशातील सर्व समाजांमध्ये एकवाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होती. त्याऐवजी समाजामध्ये, धर्मामध्ये व विविध भाषिकांमध्ये विभाजन कसे होईल, कटुता कशी वाढेल यासंबंधीची भूमिका ते घेत आहेत, असा आरोप केला होता.
यासाठी आम्ही देशपातळीवर 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे इंडियाची बैठक व दुसऱ्या दिवशी ०१ सप्टेंबर रोजी सभा घेतली जाईल. यामाध्यमातून मोदी सरकारविरुद्ध जनमत कसे तयार करू शकतो आणि पर्याय कसा देऊ शकतो याचा विचार केला जाईल, असेही पवार यांनी सांगितले होते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.