Mumbai, 11 February : महायुतीमध्ये एका मागून एक धक्के खाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारी बातमी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून आली आहे. गृहमंत्री, पालकमंत्री पदांमध्ये डावलण्यात आल्यानंतर शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीतूनही वगळण्यात आले होते. तो, शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत शिंदेंना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे शिंदे यांचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज (ता. ११ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत (Cabinet Meeting ) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष असणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्री या विभागाचे मंत्री असतील असे २०१९ मधील कायद्यात तरतूद होती. मात्र, त्यात आता बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीमध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन समिती (Disaster Management Committee) ही २०१९ मध्ये अस्तित्वात आली होती. या समितीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि काही ठराविक विभागाचे मंत्री असतील, अशी तरतूद त्या नियमांमध्ये होती. जुन्या नियमानुसार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समितीतून वगळण्यात आले होते. आता शिंदे यांच्यासाठी समितीत बदल करण्यात आलेला आहे. या समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील, तर उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री असणार आहेत. याशिवाय या समितीमध्ये मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्री असणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री, गृहमंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. तसेच, शिंदेसेनेच्या दोन मंत्र्यांना पालकमंत्रिपदीही मिळू शकलेले नाही. तसेच पालकमंत्री पदामध्ये रायगडावरून महायुतीमध्ये वाद उठला होता. तो कायम असताना खुद्द शिंदे यांनाच आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आले आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्या उद्योग मंत्रालयातही परस्पर निर्णय झाले होते. त्यामुळे सामंतही नाराज होते, असे एका मागून एक धक्क शिंदे गटाला बसत असताना आज त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह निर्णय झाला आहे, त्यानुसार शिंदेंची पुन्हा एका आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एन्ट्री होणार आहे, हे निश्चित आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांचा समावेश न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वादंग उठले होते. एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याची भावना शिंदे गटात तयार झाली होती. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधाण आले होते. राज्याच्या आज कॅबिनेटमध्ये या आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थान समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.