Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! छगन भुजबळांनी नोव्हेंबरमध्येच दिला होता मंत्रिपदाचा राजीनामा ?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या होत्या. त्यावर नाराज झालेले ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर महिन्यातच राजीनामा दिला होता. भुजबळांनी दिलेला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वीकारला नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) गेल्या चार-पाच महिन्यांपासून उपोषण करत सरकारवर दबाब निर्मिती केली होती. यातूनच सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीची स्थापना करत मराठा कुणबी आरक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरकार ओबीसींच्या ताटातील हिरावून घेत असल्याचा आरोप भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांनी केला होता. यातूनच भुजबळांनी 16 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली.

ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश असल्याने असलेले आरक्षण तोकडे पडते. त्यातच कुणबी प्रमाणपत्रामुळे कोट्यवधी मराठ्यांचा ओबीसीत समावेश होणार आहे. परिणामी ओबीसींच्या वाट्याला काय येणार, असा सवाल भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरकारला केला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नसून त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे. ओबसीत त्याचा समावेश करू नये, अशी भुजबळांनी जाहीरपणे मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर रान पेटवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोहिमेतून महाएल्गार सभा घेण्यात आल्या. मनोज जरांगे आणि भुजबळांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. परिणामी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात होते. याच परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये छगन भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT