CM Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde : 'चांगले काम करायचे नसेल, तर ..' ; एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा!

Eknath Shinde News : जाणून घ्या, जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणाला उद्देशून हा इशारा दिला आहे.

Pankaj Rodekar

Thane News : 'चांगले काम करणाऱ्यांना मी शाबासकी देतोच, मात्र चांगले काम करायचे नसले तर त्यांच्या बाबतीत काय करायचे, हे सुध्दा मला ठाऊक आहे.' अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भरभाषणात धारेवर धरले.

याच दरम्यान साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे उदाहरण देत ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचेही कान टोचण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी यावेळी केले. तर, जिद्द असेल तर सर्व काही होते. त्यामुळे यापुढे कामे त्यात्या वेळेत आणि व्यवस्थित करा, मला निर्णय घेण्यास लावू नका, असा दमही मुख्यमंत्री शिंदे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकुलित तरीही किफायतशीर दरात धावणाऱ्या 5 हजार 150 ई - बस योजनेतील बसचे लोकार्पण मंगळवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, माजी आमदार रवींद्र फाटक आणि एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. माधव सुपेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी 'काळ बदलत आहे, स्पर्धात्मक युग येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यात आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत. एसटी मागील कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रवाशांना सोय देत आहे. त्यामुळे एसटीही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचे सांगताना, गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे.' असेही ते म्हणाले.

तसेच 'एमआयडीसीकडून 600 कोटींचा निधी मिळाला आहे. सुशोभीकरण करा, खड्डे पडणार नाही, हे पाहा. असे म्हणत, खोपट एसटी डेपोबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, येथे रंगरंगोटी का झाली नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अचानक खोपट डेपोची केली पाहणी -

एसटी डेपोच्या दुरावस्थेबाबत आणि अस्वस्छतेबाबत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष खोपट डेपोमधील स्वच्छतागृहासह, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली.यावेळी ही स्वच्छतागृह पुरेशी स्वच्छ नसल्याचे तसेच विश्रांतीगृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यात बदल करण्याचे तसेच कर्मचाऱ्याना अंघोळीला गरम पाणी मिळावे यासाठी गिझर, पिण्यासाठी गार पाणी मिळावे यासाठी कुलर तसेच स्वच्छ स्वच्छतागृह तयार करावे असे सांगितले. तसेच ठाणे येथील खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावे असे निर्देश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ. माधव सुपेकर यांना दिले.

तर सर्वत्र चांगल्या बसेस पाठवा...

मुख्यमंत्र्याच्या गावाकडे बंद पडणाऱ्या गाड्या पाठवू नका, मी त्यांना चांगल्या गाड्या मिळतील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तेथे चांगल्या गाड्या पाठवा, मात्र त्या गाड्या फक्त मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या गावाकडेच नाहीतर सर्वत्र पाठवा असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

मोफत फिरणाऱ्या ज्येष्ठांची संख्या जास्त...

75 वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास सुविधा असल्याने आता ज्येष्ठ नागरिकही एसटी बसमधून तालुका पातळीवर कामासाठी अथवा औषधोपचारासाठी जात आहेत. ही संख्या किती असेल असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारतात. अधिकाऱ्यांकडून दहा लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ती संख्या दहा लाखांहून अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा नेते अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशामुळे आता महायुती सरकार मजबूत झालं आहे. त्यांचा नक्कीच महायुतीला फायदा होणार आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

मंगळवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 5 हजार 150 ई बसेसचे लोकार्पण करण्यात आले. याचदरम्यान प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. असा प्रश्न विचारला, त्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकार हे मजबूत झालेले आहे आणि नक्कीच त्यांचा फायदा महायुती सरकारला होईल असे म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT