Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

एका वर्षाच्या कारकिर्दीवर मुख्यमंत्री शिंदे समाधानी; म्हणाले...

राहुल क्षीरसागर

CM Eknath Shinde: घर सर्वाना मिळेल मात्र पाया मजबूत असायला हवा, राज्यातील युती सरकारला देखील पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे, या एका वर्षात विश्वासाचा पाया मजबूत झाला आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. घर आणि नोकरी मिळाली तर खोळंबलेली लग्ने देखील आता होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. या सोडतीत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता अनामत रकमेसह प्राप्त ४८,८०५ अर्जाची संगणकीय सोडत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात आली.

सदनिका आणि भूखंडांच्या अर्जांची सोडत होत असतांना. एकनाथ शिंदे व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात उपस्थित होते. प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून होत आहे, म्हडा आपली जबाबदारी यशस्वीपणे पेलत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

घराबरोबर नोकरीची जबाबदारी देखील सरकारने उचलली आहे, त्यानुसार रोजगाराची १ लाख पदे भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे घर आणि नोकरी मिळाली तर खोळंबलेली लग्ने देखील आता होतील असेही ते म्हणाले. सोडतीत ज्यांना घरे मिळतील त्यांना त्यांच्या घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा असे निर्देश ही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले. पंतप्रधान आवास योजनेतून देखील ९८४ घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील सहा हजार रखडलेल्या घरांचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्दा देखील लवकरच मार्गी लावण्यात यावा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. याशिवाय मुरबाड येथे देखील म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी आमदार किसन कथोरे यांना दिले. बीडीडी चाळीचा विकास करताना येथे १६ हजार घरे दिली जाणार आहेत, तर धारावीचा विकास देखील म्हाडाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाने मागील काही वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातील सरकारला देखील पुढील महिन्यात एक वर्षे पूर्ण होणार आहे, या युती सरकारने देखील या एका वर्षात जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून आपला पाया मजबूत केला असल्याचेही ते म्हणाले. राज्यात डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करीत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT