Manoj Jarange Patil and CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांची भाषा राजकीय, त्यांच्या मागे कोणीतरी...'; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

Ganesh Thombare

Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांमध्ये फार चलबिचल असून अस्थिरता असल्याचा आरोपही त्यांनी केला. (CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil)

याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषण थांबवत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. तसेच जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देत "आता जरांगे पाटलांची ही राजकीय भाषा असून त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचा वास येतोय", असा आरोप केला. तसेच सरकारनं संयम ठेवलेला आहे. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दात त्यांनी थेट इशारा देखील दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा प्रकारचे वक्तव्य ही राज्याची संस्कृती नाही. जरांगे-पाटलांना कोणी बोलायला लावतंय का ? आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र आता जरांगे पाटील यांची भाषा पातळी सोडून ते वापरत आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाला जो शब्द दिला तो सरकारने पूर्ण केला आहे. आज काही लोक म्हणतात आरक्षण टिकणार नाही. पण त्यांनी त्यांच्या काळात आरक्षण दिले नाही. फक्त समाजाचा वापर करुन घेतला. आता आम्ही आरक्षण दिले तर ते म्हणतात कोर्टात टिकणार नाही. मग त्याची कारणं देखील त्यांनी दिले पाहिजेत. आपण हे आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि कोर्टात टिकणारे दिले आहे", असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

"मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या, त्या सर्व त्रुटी आपण दूर केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे टिकणारे आहे. सरकार कोर्टात हे आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. पण काहीजण मराठा समाजाचं खच्चीकरण करत आहेत", असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

"मराठा समाजाने अन्यथा कुणीही कायदा हातात घेऊ नये. संयम पाळावा. जसं आरक्षण टिकवणं हे सरकारची जबाबदारी आहे, तसेच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहणंही सरकारची जबाबदारी आहे. काही लोकं अराजकता पसरवत आहेत. पण जनता हुशार आहे. सरकार जे काम करतंय त्याला साक्षीदार पण जनता आहे. यात कोणीही लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करु नये", असं आवाहनही त्यांनी केले.

"मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेवून या मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरले आहेत. त्यांच्या अनेक मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. जरांगे पाटील एक प्रामाणिक भावना घेऊन या लढ्यात उतरले आहेत अशी आमचीही भावना होती. आत्तापर्यंत मराठा समाजाचे 56 आंदोलन झाले. पण कुठे काही झाले नाही. मात्र यावेळी काय झाले ? कुढे आगीच्या घटना घडल्या ? कुठे दगडफेक झाली, अशा प्रकारच्या घटना होऊ नये. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा मागण्या बदलल्या आहेत. याआधी 56 मोर्चे शांततेत झाले. मात्र, यावेळी कुठे आगीच्या तर कुठे दगडफेकीच्या घटना घडल्या, त्यामुळे तरूणांनी सावध राहिले पाहिजे, अशा माझ्या सूचना आहेत", असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

"संयम ठेवलाय, पण संयमाचा अंत पाहू नका..."

"आंदोलन कर्त्यांनी कायदा हाती घेऊ नये, कायदा सर्वांसाठी समान आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं समजू नये. या सर्व बाबींवर सरकार लक्ष ठेऊन आहे. कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही. मात्र गृहविभाग या बाबतीत पूर्णपणे लक्ष ठेऊन आहे. मी सांगतो की, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणी जबाबदार असतील तर त्यांना सरकार पाठीशी घालणार नाही. कायद्यापेक्षा कोणीही स्वतःला मोठं समजू नये. सरकारने संयम ठेवलाय. पण संयमाचा अंत पाहू नका", अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT