Shekhar Bagade News Sarkarnama
मुंबई

Shekhar Bagade News : भाजपने केली शिंदेंची कोंडी; शेखर बागडेंची थेट एसीबीकडे तक्रार

शर्मिला वाळुंज

Kalyan-Dombivli News : भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत भाजपने बागडे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. बागडे यांना सक्तीच्या रजेवर सध्या पाठविण्यात आले आहे. यानंतर आता भाजपने बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे 50 ते 60 कोटीची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली आहे.

भाजपचे पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्ती नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. डोंबिवली प्रकरणावरुन मंत्री चव्हाण आक्रमक असल्याने राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांना समर्थन दिले. या आक्रमकपणातून भाजपने कल्याण, ठाणे, पालघर लोकसभेसाठी दावा करुन शिंदेच्या शिवसेनेला (Shiv Sena) कैचीत पकडले.

शेखर बागडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतले असल्याचे बोलले जाते. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सार्वजनिक कार्यक्रम विषयांवरुन धुसफूस सुरू आहे. मंत्री चव्हाण यांना डोंबिवलीत लक्ष करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. याचा एक भाग म्हणून चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे समर्थक डोंबिवलीतील भाजप (BJP) पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा बागडे यांनी दाखल केला आहे.

जिल्हा शिवसेना नेत्याच्या इशाऱ्यावरुन बागडे यांनी ही कृती केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली. बागडे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने त्यांची, त्यांचे मंत्रालयातील बंधू मंगेश आणि कुटुंबीयांची सुमारे 50 ते 60 कोटीची बेहिशोबी मालमत्ता शोधून त्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा याठिकाणी लागू होत असल्याने ईडीकडेही बागडे यांची तक्रार केली जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेखर बागडेंच्या चौकशीची मागणी केली आहे. एका पोलीस निरीक्षकाकडे एवढी मालमत्ता कुठून आली? बेहिशोबी मालमत्ता ते कसे काय गोळा करू शकतात, सरकारने याबाबत चौकशी करावी, अशी मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT