Nana Patole Sarkarnama
मुंबई

Congress Meeting : काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल; फुटीर आमदारांबाबत मुंबईतील 19 रोजीच्या बैठकीत निर्णय होणार

Damage Control : फुटलेल्या आमदारांच्या विरोधात काय कारवाई करायची याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 July : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ आमदार फुटल्याची चर्चा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे शेकापचे जयंत पाटील यांना पराभव पत्कारावा लागला आहे. फुटलेल्या आमदारांबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने येत्या १९ जुलै रोजी मुंबईत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून होताना दिसत आहे.

प्रदेश काँग्रेसने (Congress) बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले आहे.

विधान परिषद निवडणुकीत पक्षाने मिळविलेले यश, तसेच याच निवडणुकीत फुटलेल्या मतांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. पक्षविरोधी भूमिका बजावणाऱ्या आमदारांबाबत विचारविनिमय होणार आहे. संबंधित आमदारांच्या विरोधात काय कारवाई करायची याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला कोणते आमदार येणार आणि कोणते आमदार येणार नाहीत, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

मागील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मते फुटली होती. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. हंडोरे हे काँग्रेस हायकमांडने दिलेले उमेदवार होते, त्यानंतरही त्यांचा पराभव झाला होता, त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती.

त्या निवडणुकीनंतरच फुटलेली मते आणि पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांचा अहवाल प्रदेश काँग्रेसने हायकमांडला पाठवला होता. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसकडून खरंच संबंधित आमदारांवर कारवाई करण्यात येते का? हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT