मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटत आहेत. दरेकरांवर गुन्हा दाखल होताच भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट दरेकरांना लक्ष्य केले आहे. त्यांनी दरेकरांचा उल्लेख दरोडेखोर असा केला आहे.
दरेकरांनी बॅक लुटली, त्यामुळे दरेकरांनी आपले आडनाव बदलून दरोडेखोर करावे. हा गुन्हा योग्य पद्धतीने दाखल झाला आहे, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँक निवडणुकीतील फसवणुकीप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र, यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती.
दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या नावाचा उल्लेख करून दरेकरांवरील गुन्हा चुकीचा असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कुठलीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत. सगळ्या पक्षाचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुडाच्या भावनेने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आम्ही घाबरणार नाही. न्यायालयात जावू. विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारची कारवाई, आधी असं कधीच घडलं नव्हतं. आमचा आवाज बुलंद राहील.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी फडणवीसांनी केलेला दावा खोडून काढला. ते म्हणाले की, जळगावचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांचे नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं. याचा मला खेद वाटतो. प्रविण दरेकर यांच्यावर सरकारने दाखल केलेला गुन्हा योग्यच आहे. कारण ते प्रत्यक्ष मजूर संस्थेचे मजूर सदस्य आहेत. देवकर हे कुठल्याही मजूर संस्थेचे सभासद नाहीत. पण दरेकर हे सभासद आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. ते असे मजूर आहेत ज्यांच्याकडे दोन-दोन कोटी रुपयांची गाडी आहे. पन्नास कोटी कोटींच्या बंगल्यात राहणारे मजूर आहेत. त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केलेला गुन्हा योग्य आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केलेला उल्लेख खोटा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.