Mallikarjun Kharge Sarkarnama
मुंबई

Congress President Election : खर्गे उद्या मुंबईत घेणार नेत्यांच्या गाठीभेटी; थरूरही लागले कामाला!

खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच, ते शेजारील कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांना महाराष्ट्रातून सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाचे (President) उमेदवार आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उद्या (ता. ७ आक्टोबर) मुंबईत (Mumbai) येत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या सर्व नेत्यांच्या गाठीभेटी ते घेणार आहेत. दरम्यान, खर्गे यांच्या विरोधात दंड थोपटणारे माजी मंत्री शशि थरूर (Shashi Tharoor) हेही येत्या नऊ आक्टोबर रोजी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीस वेग आला आहे. (Congress President Election : Mallikarjun Kharge will come to Mumbai tomorrow)

दरम्यान, काँग्रेसमधील नाराज जी २३ गटातील नेत्यांनीही खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे या गटातील प्रमुख असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशाही ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांच्या विरोधात शशि थरूर उतरले आहेत. दोन्ही नेत्यांकडून सर्वच राज्यांत जाऊन प्रचार करण्यात येत आहे. त्यानुसार खर्गे उद्या (ता. ७ सप्टेंबर) महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या मतदारांना ते मुंबईत भेटणार आहेत. टिळक भवन येथे उद्या संध्याकाळा पाच वाजता ते या निवडणुकीतील मतदार असलेल्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच, ते शेजारील कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांना महाराष्ट्रातून सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वांत म्हणजे काँग्रेस हायकमांडचा त्यांनाच पाठिंबा असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. गांधी कुटुंबीयांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गे यांच्या विरोधात मैदानात उतरलेले शशि थरूरही येत्या नऊ तारेखला मुंबईत येत आहेत. तेही मुंबईत काँग्रेस नेत्यांशी संवाद साधून काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांकडून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बिनविरोध न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे आणि थरूर या दोघांचेच अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. कोणीही माघार घेतली नाही आणि निवडणूक लागल्यास १७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ता. १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT