बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या झेंडा शिवसेनेचा (Shivsena) आणि अजेंडा राष्ट्रवादीचा (NCP) या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तुम्हीही मंत्रिमंडळात होताच ना? बसताना नेहमी ते माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे, पण मी त्यावेळी कधी हे ऐकलं नाही की झेंडा शिवसेनेचा; पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. (Eknath Shinde's allegation need not be given importance : Ajit Pawar)
विरोधी पक्षनेते पवार हे बारामतीत माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी (ता. ५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असा आरोप केला होता. त्याला पवार यांनी आज (ता. ६ ऑक्टोबर) बारामतीत उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तीनही पक्षाचे लोक होते. आम्हाला विविध पक्षांना सोबत घेऊन जायचा अनुभव आहे. जी धोरणे अडीच वर्षांत राबवली गेली, कर्जमाफी, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासह सर्व निर्णय घेतले, ते सर्वांनी मिळूनच घेतले आहेत. कालची वक्तव्ये राजकीय स्वरुपाची होती, त्याला फार महत्व द्यावं, असं मला वाटत नाही.
दसरा मेळाव्याच्या भाषणाबद्दल बोलताना काहींची भाषण फार लांबली, असा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. बीकेसी मैदानावरील सभेसाठी बसेस बुकींग झाल्याने सणासुदीच्या काळात बसेस कमी पडल्या, त्यामुळे प्रवाशांची अडचण झाल्याचे काहींनी मला सांगितले. अशा गोष्टी करता कामा नये, ज्या जनतेसाठी गाव तेथे एसटी हे धोरण राबविले गेले, त्यांची सोय आपण केली पाहिजे.
वेदांताबाबत महाविकास आघाडी सरकारने टक्केवारी घेतल्याचा आरोप होत आहे, त्या बाबत अजित पवार म्हणाले, टक्केवारी घेतली म्हणता ना, मग सिध्द करुन दाखवा ना. वेदांताची शेवटची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये बैठक झाली, त्याचे इतिवृत्तही उपलब्ध आहे. महाविकास आघाडीचे सरकार जूनला गेले, त्यानंतर जुलैमध्ये हाय पॉवर समितीची बैठक झाली, त्यात वेदांताचाच विषय होता. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार असतानाही दोन लाख रोजगारनिर्मितीचा कारखाना राज्यातून गेला, याबाबत युवकांचा रोष आपल्यावर येईल, या भीतीपोटी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जातात. सरकार आल्यावर सभागृहात मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. रोजगारनिर्मिती होईल, असे सांगितले होते, त्या मुळे आमच्यावरील आरोपांत कोणतेही तथ्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.