Palghar Politics Sarkarnama
मुंबई

Palghar Politics: पालघर लोकसभेसह चार विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा; 'बविआ'चीही धाकधूक वाढली !

Congress News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर

संदीप पंडित

Palghar News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटप आणि उमेदवार चाचपणी निर्णयासंदर्भात काँग्रेसही अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे.

कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात निवडणुकीची गणिते जुळवू लागली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत शुक्रवारी टिळक भवन येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पालघरमधील कार्यकर्त्यांनी पालघर लोकसभेवर दावा केला आहे. त्याचबरोबर विधानसभाही लढविणार असल्याचा ठराव केला आहे. काँग्रेसने पालघरमधील 6 पैकी 4 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये पालघर, बोईसर, विक्रमगड आणि वसई या मतदारसंघाचा समावेश आहे.

विक्रमगड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील भुसारा हे आमदार असताना काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता यावर काँग्रेसचे वरिष्ठ काय भूमिका घेतात? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसने लोकसभसह विधानसभेच्या निवडणुकीची देखील तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार की नाही? याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तर दुसरीकडे काँग्रेस अनेक मतदारसंघावर दावा करत आहे.

आतापर्यंत काँग्रेस पक्ष लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत आला होता. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसला 'बविआ'ने काही मदत केली नसल्याचा आरोप येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने पालघरवर दावा केला आहे. तसेच विधानसभेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालघर, बोईसर, वसई आणि विक्रमगड मतदारसंघाची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीतील एकाच पक्षाने चार जागांवर दावा केल्यामुळे काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद जास्त असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे इतर पक्ष कसे बघतात? तसेच यावर काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का

काँग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे 'बहुजन विकास आघाडी'साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस पक्ष नेहमी 'बविआ'च्या मागे उभा राहिला. पालघर लोकसभेबरोबरच विधानसभेलाही काँग्रेस 'बविआ'ला पाठिंबा देत होता. पण आता जर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असेल तर त्याचा फटका लोकसभेबरोबरच विधानसभेलाही 'बविआ'ला बसण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT